पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या घरी बाप्पाची आरती केली
देशभरात गणेशोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या घरी जाऊन बाप्पाची आरती केली.मोदींनी यापूर्वीच एका संस्कृत श्लोक द्वारे देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.
बुधवारी नरेंद्र मोदी यांनी पीयूष गोयल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि गणेशाची आरतीही म्हंटली. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर माझे सहकारी पियुष गोयलजी यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाला गेलो होतो. भगवान श्री गणेशाची कृपा सदैव आपल्यावर राहो असं ट्विट यानंतर मोदींनी केलं आहे. मोदींचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार वायरल झाला आहे.
दरम्यान, कोरोना नंतर प्रथमच देशभरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होत आहे. दहा दिवसांचा गणेशोत्सव गणेश चतुर्थीच्या दिवशी सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीला संपतो. बुद्धीची आणि सौभाग्याची देवता असलेल्या गणेशाचे भक्त भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात त्यांचा जन्म साजरा करतात. या विशेष प्रसंगी लोक घरोघरी गणपतीची मूर्ती आणतात, गणेशाची पूजा करतात आणि आपल्यावरील संकट दूर करा असं साकडं गणरायाला घालतात.