भावाने बहिणीला केले ब्लॅकमेल, आपल्याच बहिणीवर केला बलात्कार
मुंबईतून एक हादरवणारी बातमी आली आहे. येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
तसेच पीडितेच्या अल्पवयीन भावाला देखील सहआरोपी करण्यात आले असून त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, 5 एप्रिल रोजी पीडिता आपल्या आईसह गर्भपातासाठी एका सरकारी रुग्णालयामध्ये पोहोचली होती. पीडिता आठ आठवड्यांची गर्भवती होती. याची माहिती रुग्णालय प्रशासनाने वांद्रे पोलिसांना दिली. एका 19 वर्षीय तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून आपल्याची शारीरिक संबंध ठेवल्याची माहिती पीडितेने पोलिसांना दिली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.
वांद्रे पोलिसांनी यानंतर हे प्रकरण अँटॉप हिल पोलीस ठाण्याकडे हस्तांतरीत केले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांमध्ये आरोपीला अटक केली. आरोपीनेही आपला गुन्हा कबूल केला. मात्र पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांना धक्काच बसला. पीडितेच्या गर्भामध्ये असणाऱ्या भ्रूणाचा डीएनए आरोपीशी जुळला नाही. डीएनए टेस्टमध्ये पीडितेच्या गर्भातील भ्रूणाचा डीएनए तिच्या 17 वर्षीय अल्पवयीन भावाशी जुळला. यानंतर एसीपी अश्विनी पाटील आणि महिला पोलिसांनी पीडितेची अधिक चौकशी केली तेव्हा तिने हादरवणारा खुलासा केला.
आरोपी तरुण आणि पीडितेमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर पीडितेच्या भावाने बहिणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पीडितेच्या असाह्यतेचा फायदा उठवत अल्पवयीन भावाने आपल्याच बहिणीवर बलात्कार केला. यातून पीडिता गर्भवती राहिली. या प्रकरणी आता पोलिसांनी पीडितेच्या भावालाही ताब्यात घेतले असून जिल्हा सत्र न्यायालय आणि बाल न्याय मंडळापुढे आरोपपत्र दाखल केले आहे.