बीड स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा
बीड जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा आणि स्वराज्य महोत्सव राबवण्यात येत आहे
दि. 13 ते 15 ऑगस्ट रोजी पोलीस विभागाच्या वतीने बीड शहरातील चौका चौकात स्वातंत्र्याची धून आणि देशभक्तीपर गीत पोलीस पथकाच्या वतीने वाजवले जाणार आहे
बीड : स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण झाल्याच्या अनुषंगाने अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा आणि स्वराज्य महोत्सव राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट रोजी पोलीस विभागाच्या वतीने बीड शहरातील चौका चौकात स्वातंत्र्याची धून आणि देशभक्तीपर गीत पोलीस पथकाच्या वतीने वाजवले जाणार आहेत. तर जिल्हा परिषद आणि जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने अनेक महोत्सवांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत. त्याअनुषंगाने याची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर , जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार हे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा परिषदेच्या वतीने बसस्टॉप, अनेक धार्मिक स्थळे, मंदिरे या ठिकाणी स्वातंत्र्यविषयक मजकुराचे पोस्टर, स्टीकर लावण्यात येणार आहेत. क्रिकेट स्पर्धा, सायकल रॅली आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. बीड जिल्ह्याला हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत 5 लाख 94 हजार 667 तिरंगे ध्वज लागणार आहेत. केंद्र शासनाच्या वतीने बीड जिल्हा प्रशासनाला 70 हजार ध्वज प्राप्त झालेले आहेत. उर्वरित ध्वज हे अनेक विक्री करणार्या शासकीय एजन्सीकडून खरेदी करण्यात येऊन पंचायत समिती, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहेत.