पेट्रोल 2 रुपये लिटर, पण खायला अन्न नाही; देशाची भयानक अवस्था
असे अनेक देश आहेत, जे एके काळी कमालीचे सधन आणि प्रसिद्ध होते; पण आता ते उद्ध्वस्त झाले आहेत. व्हेनेझुएलाचा अशाच देशांमध्ये समावेश होतो. या लॅटिन अमेरिकन देशात जगातले सर्वांत जास्त तेलाचे साठे आहेत.
एक काळ असा होता, की लॅटिन अमेरिकेतल्या देशांपैकी या देशाची अर्थव्यवस्था सर्वांत मजबूत होती; पण गेल्या 10 वर्षांत या देशाची इतकी वाताहत झाली आहे, की संपूर्ण अर्थव्यवस्थाच उद्ध्वस्त झाली आहे.
तिथले नागरिक आपल्या देशाच्या विनाशासाठी राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना जबाबदार धरतात. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी पुन्हा निवडणूक जिंकली आहे. मादुरोंच्या राजवटीत व्हेनेझुएलाचा जीडीपी 80 टक्क्यांनी घसरला आहे. महागाई आणि गरिबीमुळे 10 वर्षांत 70 लाख लोकांनी देश सोडून इतर ठिकाणी स्थलांतर केलं आहे.
एके काळी व्हेनेझुएला हा लॅटिन अमेरिकेतला श्रीमंत देश होता. आता या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. 10 वर्षांत तिथली महागाई 130,000 टक्क्यांहून अधिक दराने वाढली आहे. यावरून देशाच्या आर्थिक स्थितीचा अंदाज लावता येऊ शकतो. व्हेनेझुएलातले सामान्य नागरिक वीज संकटापासून इतर सर्व प्रकारच्या संकटांचा सामना करत आहेत.
व्हेनेझुएलामध्ये जगातला सर्वांत जास्त तेलाचा साठा आहे. तिथे एक लिटर पेट्रोलची किंमत दोन रुपयांपेक्षा कमी आहे. तेलाची संपत्ती असूनही या देशातले लोक दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत आहेत. कारण, व्हेनेझुएलामध्ये किरकोळ चलनवाढीचा दर जगात सर्वाधिक आहे. परिस्थिती अशी आहे, की तिथल्या गरीब लोकांना इतरांचं उष्टं अन्न खावं लागत आहे.
या परिस्थितीमुळे एका दशकात 70 लाखांहून अधिक नागरिकांनी देश सोडला आहे. या श्रीमंत देशाची अशी अवस्था कशी झाली हा प्रश्न आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, समाजवादी धोरणं आणि अमेरिकेशी संघर्ष या दोन कारणांमुळे देशाची अवस्था बिकट झाली आहे. 10 वर्षांपूर्वी सत्तापालट झाल्यानंतर राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्या कमकुवत आर्थिक धोरणांमुळे महागाई झपाट्याने वाढली.
दैनिक भास्करने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, व्हेनेझुएलामध्ये निकोलस मादुरो पुन्हा निवडून आल्यानंतर मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू झाली आहेत. निकालात हेराफेरी झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यानंतर जनता रस्त्यावर उतरली आहे.