भाजप खासदाराचे घर आणि अकोला-पूर्णा रेल्वे बॉम्बने उडवण्याची धमकी !
अकोला : माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे यांच्या घरी आणि अकोला रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या पूर्णा एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची अफवा पसरविणारा माथेफिरू युवक नितीन दिलीप गोटुकले (३२) रा.बाभुळगांव जंहागीर याला गुरुवारी अकोल्यात आणण्यात आले.
न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला अटक करण्यात आली असून, त्याने ही अफवा कोणत्या उद्देशाने पसरविली होती, याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या माथेफिरूला बुधवारी ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
पोलिस नियंत्रण कक्ष मुंबई दक्षिण यांना ता. २६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता मोबाईलवरून अकोला-पूर्णा एक्स्प्रेसमध्ये तसेच खासदार संजय धोत्रे यांचे घरी बॉम्बस्फोट होणार आहे, अशी माहिती दिली. ही माहिती पोलिस नियंत्रण कक्ष अकोला येथे प्राप्त होताच पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत व उपविभागीय पोलिस अधीकारी सुभाष दुधगांवकर तसेच स्थानिक गुन्हे शाखा, अकोला प्रमुख संतोष महल्ले, विशेष पोलिस पथक प्रमुख विलास पाटील, रामदासपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर शेळके, सिव्हिल लाईन्सचे पोलिस निरीक्षक भानुप्रताप मडावी, व इतर अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी तत्काळ रेल्वे स्टेशन व खासदार धोत्रे यांचे निवास स्थान गाठले. संपूर्ण यंत्रणा कामी लागल्यानंतर कुठेही बॉम्ब नसल्याचे खात्री झाली.
दोन्ही ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. ही माहिती सार्वजनिक शांतता बिघडविण्याचे उद्देशाने जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण करण्याची अफवा पसरविल्याबाबत अज्ञात इसमाविरुध्द सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशन येथे पोलिस हेडकॉन्स्टेबल विजय पंडित यांनी लेखी रिपोर्ट दिल्याने अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला.