शरद पवारांचे सर्व दौरे अचानक रद्द, प्रकृतीबाबत आली महत्त्वाची अपडेट

देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभेच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दोन्ही बाजूच्या पवारांकडून एकमेकांवर धारदार टीका करण्यात आली.
बारामतीतल्या लढतीचा प्रचार संपून काही तास होत नाहीत तोच शरद पवारांनी त्यांच्या उद्याच्या सर्व नियोजित सभा आणि दौरे रद्द केले आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवारांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
घसा बसल्यामुळे आजच्या बारामतीच्या सभेतही शरद पवार फारसे बोलू शकले नाहीत. शरद पवारांची उद्या म्हणजेच 6 मे रोजी कात्रजमध्ये नियोजित सभा होती. ही सभाही रद्द करण्यात आली आहे. शरद पवारांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेतला गेल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांमध्ये शरद पवार सातत्याने राज्याचे दौरे करत आहेत आणि सभा घेत आहेत, त्यातच राज्यात उन्हाचा कडाकाही वाढलेला आहे. सातत्याने राज्यभर दौरे केल्यामुळे शरद पवारांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती आहे.
बारामती लोकसभेच्या निवडणुकीकडे फक्त महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष लागलं आहे, कारण या मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना होणार आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सामना शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यात होणार आहे. पवार कुटुंबातल्या या सामन्यात नेमका कुणाचा विजय होतो, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. 7 मे रोजी बारामतीच्या जागेसाठी मतदान पार पडणार आहे. तर लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जूनला लागणार आहे.