जनरल नॉलेज

कोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल…


कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्याजवळ सेनापती कापशी हे एक गाव आहे. कापशी गावात, अस्सल चामड्यात बनवली जाणारी ही चप्पल. या चपलीचं नाव गावावरून सेनापती कापशी पडलं. कोल्हापुरी चप्पल म्हणलं की हीच ती सेनापती कापशी चप्पल डोळ्यासमोर येते.

कोल्हापूर संस्थानामधील एकूण ९ जहागिरींपैंकी कापशी हे एक गाव आहे. हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांचं हे गाव. यावरून या गावाला सेनापती कापशी म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

२०० वर्षांपुर्वी या गावातील गोविंद लक्षमण चव्हाण यांनी त्यावेळच्या राजे घराण्यातील घोरपडे यांना चामड्यापासून तयार केलेला एक आकर्षक चपलांचा जोड दिला. घोरपडे यांनी हा जोड इतर संस्थानांमधले राजे आणि सेनापतींना दाखवला, त्यांनाही हा जोड आवडला आणि त्यांनीही या चपलेचे जोड मागवले.

पाहता पाहता या चपलेची मागणी वाढत गेली आणि कोल्हापुरची कापशी चप्पल जगभरात पोहचली. या चपलेने भारताच्या वेगवेगळ्या राज्यात आणि जगात आपलं मार्केट तयार केलं.

या चपलेची क्रेझ राजकिय नेत्यांमध्ये जास्त प्रमाणात वाढली…

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणही हीच कापशी चप्पल वापरायचे. त्यावेळी दत्तात्रय कृष्णाजी चव्हाण हे यशवंतराव चव्हाण यांना चप्पल बनवून द्यायचे, आजही चव्हाण यांच्या दुकानात यशवंतराव चव्हाण यांच्या चपलेचे माप आहेत. प्रा.एन.डी.पाटील, विजयसिंह मोहीते पाटील, रणजितसिंह पाटील आणि उत्तर प्रदेश व कर्नाटकातील आणि महाराष्ट्रातील राजेघराण्यात आजही या चपलेची मागणी आहे.

सोबतच ही चप्पल वापरण्याचे अनेक फायदेही आहेत…

उन्हाळ्यात ही सेनापती कापशी चप्पल वापरल्याने डोळ्यांना फारसा त्रास होत नाही. विशेष म्हणजे या चपलेने पायाला कसल्याही प्रकारची इजा होत नाही. चपलेची कातडी जाड असल्यामुळे चपलेमध्ये काटा, काच किंवा बारीक खिळा रूचत नाही.

सेनापती कापशी चपलेचे तीन वेगवेगळे प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे साधारण कापशी.

साधारण कापशी ही हाताने शिवलेली चप्पल असते. या चपलेत दोन पट्टे असतात. पट्टे म्हणजेच चामड्याच्या वेण्या असतात. चामड्याच्या बारीक वेण्या बांधणं वाटतं तितकं सोप्प काम नाहीये. काही ठिकाणी ८ वेण्यांचा तर काही ठिकाणी १२ वेण्यांचा पट्टा असतो. प्रत्येक कलाकाराची स्वतःची एक नजाकत असते आणि वर्षानुवर्षे एक शैली घडलेली असते.

या चपलेतला दुसरा प्रकार म्हणजे पेपर कापशी हा प्रकार.

साधारण कापशी नंतर येते ती पेपर कापशी, नावामुळेच कळल असेलच की ही पातळ असते अगदी कमी जाडीची सडसडीत अशी. हि इतकी पातळ असते. की अक्षरशः गुंडाळून बॅगमध्ये ठेवता येते. कलाकार लोक किंवा हलकीफुलकी चप्पल वापरायची आवड असणारे खास आवडीने पेपर कापशी वापरतात.

या प्रकारातील शेवटचा प्रकार म्हणजे जाड कापशी सेनापती चप्पल.

जाड कापशी ही खास रांगड्या लोकांसाठी असते. ज्यांना जाड आणि मजबूत चप्पल वापरायची मोठी हौस आणि आवड असते. तीन तळीची असणारी ही चप्पल चांगलीच जाडजुड असते आणि तितकीच मजबूत सुद्धा. एकदा चप्पल घेतली की वर्षानूवर्षे चालते.

कापशी सेनापती चप्पल ही आज जगात प्रसिध्द आहे आणि या चपलेनं कोल्हापुरचं नाव संपुर्ण जगात नेऊन ठेवलं आहे. कुठल्याही जाहिरातीचा आधार न घेता देश आणि विदेशातील ब्रॅंडच्या या स्पर्धेत कोल्हापुरच्या चपलेनं आपलं मार्केट टीकवून ठेवलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button