बीड डॉक्टरला घरी बोलवून गर्भपात,पती, सासू, डॉक्टरसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
सरस्वतीचे हात आणि पाय नवरा आणि सासूने पकडून बळजबरीने अक्षरशः गर्भ कापून तुकडे करून बाहेर काढला. त्यानंतर पती, सासू गर्भाची विल्हेवाट लावली. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून बीड जिल्ह्यात पुन्हा राजरोस गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याने राज्याला धक्काच बसला आहे. परळी शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या सरस्वती नारायण वाघमोडे ही विवाहिता दुसऱ्यांदा गर्भवती राहिली.
बीड: (परळी )पहिली मुलगी असल्याने दुसरी ही मुलगी नको, असे म्हणून सासरकडील दोघांनी एका डॉक्टरला हाताशी धरून विवाहितेचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात पती, सासू, डॉक्टरसह चौघांविरुद्ध २५ जुलै रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, शहरातील २२ वर्षे विवाहितेचा सासरच्या मंडळींनी मानसिक व शारीरिक छळ केला. शिवाजीनगर भागात १६ जुलै रोजी घरीच एका डॉक्टरला बोलावून गर्भलिंग निदान केले. मुलगी असल्याचे कळल्यानंतर गर्भपात केला. हा वेदनादायक प्रकार भावास सांगून महिला पुण्यात भावाकडे गेली. विवाहित महिलेने पुणे येथील कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून हा गुन्हा कोंढवा पोलीस ठाणे येथून परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
याप्रकरणी फिर्यादी महिलाचे पती नारायण वाघमोडे, सासू छाया वाघमोडे, प्रकाश कावळे राहणार परळी व डॉ नंदकुमार स्वामी (रा बार्शी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळीच्या शिवाजीनगर येथे विवाहिता व पती राहत होते. नारायण वाघमोडे व सासू छाया वाघमोडे यांच्या सांगण्यावरून प्रकाश कावळे यांने एका बार्शी च्या डॉक्टरला घरी बोलवून फिर्यादी महिलेचे गर्भलिंग निदान केले व तिचा गर्भपात केला असा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघाविरुद्ध शारिरीक, मानसिक छळ व गर्भपात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे हे करीत आहेत.
या प्रकरणात एका आरोपीस संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी परळीच्या कोर्टात हजर केले असता 29 जुलै पर्यन्त पोलीस कोठडी मिळाली आहे. विवाहितेचे नातेवाईक पुणे येथे रहात असल्याने तिने नातेवाइकांकडे जाऊन हा सारा प्रकार सांगितला. पुणे येथील कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी विवाहितेने तक्रार दाखल केली होती.