भाजप आमदार गोळीबार प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी होणार – देवेंद्र फडणवीस
महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन सहा गोळ्या काढण्यात आल्या. त्याविषयावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ले सुरु केले आहेत. आता या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात येईल, असा निर्णय फडणवीस यांनी जाहीर केला. आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे.
गुन्हे शाखा करणार तपास
भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे. आता एसीपी रँकच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास होणार आहे. यामुळे उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याकडून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेने लागलीच तपास सुरु केला आहे. या प्रकरणातील तिघं आरोपींना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यांना दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
आमदार गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांवर आरोप
माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच आमदार गणपत गायकवाड यांनी आपण केलेल्या कृत्याचा आपणास पश्चताप नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यात आमदार गणपत गायकवाड आणि हर्षल केणे आणि संदीप सर्वांकर यांचा समावेश आहे. या प्रकरणात आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड इतर दोन फरार आहेत. त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. दुपारी आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पोलीस किती दिवस कठोडी मागणार? हे पाहावे लागणार आहे.