ताज्या बातम्या

दत्त जयंती कधी? जाणून घ्या योग्य तारीख, वेळ आणि विधी!


मार्गशीर्ष महिन्यातील मुख्य आकर्षण म्हणजे दत्त जयंतीचा सोहळा, पण दिनदर्शिकेवर दोन दिवस दत्त जयंती लिहिल्याने भाविकांचा संभ्रम निर्माण झाला आहे, की यंदा दत्त जयंती (Datta Jayanti 2023) नेमकी २५ की २६ डिसेंबरला साजरी करायची?

तर उत्तर आहे २६ डिसेंबरला! कारण दत्त गुरूंचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला आणि यंदा पौर्णिमा तिथी पहाटे ५. ४६ मिनिटांनी सुरु होणार असून त्या दिवशीचा सूर्योदय पाहणार आहे, त्यामुळे दत्त जयंतीची तारीख तीच गृहीत धरली जाईल. तर २५ तारखेला गाणगापूर येथे दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे गोंधळ दूर करा आणि दत्त जयंती कशी साजरी करायची तेही जाणून घ्या!

मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्र असताना बुधवारी प्रदोषकाळी दत्तात्रेयाचा जन्म झाला. म्हणून सर्व प्रमुख दत्तक्षेत्री तसेच जेथे दत्त मंदिर असते, तिथे ह्या दिवशी प्रदोषकाळी दत्तजन्म सोहळा केला जातो. ह्या निमित्ताने अनेक कुटुंबांमध्ये कुळाचार म्हणून मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीपासून दत्त नवरात्र पाळले जाते. तसेच दत्तजयंतीच्या निमित्ताने `श्रीगुरुचरित्र’ ह्या ग्रंथाचे पारायण सामूहिक रीतीने अथवा घरोघरी व्यक्तीगत पातळीवर केले जाते. दत्तजयंतीच्या दिवशी जन्मसोहळ्याच्यावेळी सायंकाळी दत्तजन्माचे कीर्तनही होते. दक्षिणेतही आंध्र, कर्नाटकामध्ये तसेच तामिळनाडूमध्ये दत्तजयंती साजरी केली जाते.

एकीकडे शैव आणि वैष्णव ह्या दोन प्रमुख संप्रदायांमध्ये श्रेष्ठत्वाचा वाद मिटता मिटत नव्हता. तर दुसरीकडे हिंदू-मुस्लिमांमध्ये निर्माण झालेली तेढ समाजात, देशात अशांतता, असंतोष निर्माण करत होती. नेमक्या अशा स्फोटक परिस्थितीत सर्व समाजात शांती प्रस्थापित करणारा दत्तसंप्रदाय उदयास आला. नाथसंप्रदाय, महानुभव पंथ हे दत्तसंप्रदायाशी नाते जोडून आहेत. साहजिकच ज्ञानोबा, एकनाथ महाराज हे वारकीपंथाचे अध्वर्यू, भागवतसंप्रदायातील प्रमुख संत दत्तसंप्रदायाशी गुरु-शिष्य परंपरेने जोडलेले दिसतात. परिणामीच शैव आणि वैष्णव यांच्यातील दुरावा लयाला गेला.

अत्रि-अनसूया या दांपत्याचा पुत्र मानल्या गेलेल्या दत्तात्रेयाचा जन्म ब्रह्मा-विष्णू-महेश यांचा अंश एकत्रित होऊन झाल्याची कथा सुपरिचित आहे. या तिघांचा अंश म्हणून दत्तात्रेयाची त्रिमुखी आणि सहा हातांची सगुणमूर्ती सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे. तुकोबांनी तीन शिरे, सहा हात, अशा दत्तस्वरूपाला नमन केले आहे. मात्र मुळात पुराणात एकमुखी आणि द्विभुज अथवा चतुर्भुज अशा दत्ताचे वर्णन आढळते. विशेष म्हणजे दत्तोपासनेत ध्यानासाठी त्रिमुखी दत्ताचे सगुणरूप आणि पूजाविधीसाठी पादुकांना महत्त्व दिले गेलेले असते. नरसोबाची वाडी, औदुंबर, गाणगापूर या सर्व प्रसिद्ध दत्तक्षेत्री अशा पादुकांचीच स्थापना केलेली आढळते.

योगसाधनेत दत्तात्रेयाला गुरु मानले गेल. सर्वांचे गुरु म्हणून मान्यता पावलेल्या दत्तात्रेयांनी स्वत: चोवीस गुरु केले. त्यांचा हा गुणग्राहकतेचा आदर्श आपणही आपल्या सर्वांगीण विकासासाठी अंगीकारणे योग्य ठरेल. जसे सर्वगुणसंपन्न कोणीच नसते, तसेच प्रत्येकामध्ये एखादा तरी गुण असतोच, तो जाणून घेण्यासाठी दत्तात्रेयांसारखा विशाल दृष्टीकोन ठेवला, तर आपला व्यक्तीमत्वविकास होण्यास मदत होईल, समाज अधिक निरोगी, निकोप होईल, यात शंका नाही.

ह्या दिवशी गुरुचरित्राचे वाचन, पारायण अनेक दत्तभक्तमंडळी करतात. ज्यांना काही कारणाने ते शक्य नसेल, त्यांनी निदान दत्तात्रेयांचा नामजप आपल्याला जमेल तेवढा जमेल त्यावेळी जरूर करावा. ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल त्यांनी गुरुंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. दत्तंदिरामध्ये यशाशक्ती दान करावे. भुकेल्यांना अन्न द्यावे. दत्ताचे वास्तव्य औदुंबर वृक्षाच्या तळी असते अशी पूर्वापार श्रद्धा आहे. म्हणून केवळ ह्याच दिवशी नव्हे, तर वर्षभर दर गुरुवारी औदुंबराला प्रेमपूर्वक पाणी घालावे. त्याचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे.

गेल्या शतकातील समर्थ संप्रदायातील एक थोर विभूती म्हणजे प. पू. श्रीधरस्वामी. स्वामींचा जन्मदेखील दत्तजयंतीच्या दिवशीच झाला. त्यामुळे स्वामींचे अनुयायी, भक्त आणि समर्थ संप्रदायी स्वामींची जयंती भक्तिपूर्वक साजरी करतात. या निमित्ताने आपणही स्वामींच्या जीवनचरित्राचा परिचय करून घेतला पाहिजे.

काय आहे ही संजीवनी बुटी, जाणून घ्या प्रकार,मृत संजीवनी औषधी वनस्पतींवर संशोधन

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button