‘Ph.D करून काय दिवे लावणार?’ अजितदादांच्या वक्तव्याविरोधात मराठा समाज आक्रमक; हकालपट्टीची मागणी
कोल्हापूर : नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये सारथी संस्थेतून पीएच.डी. करणाऱ्या (Ph.D. Degree) मराठा विद्यार्थ्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पीएच.डी. करून काय दिवे लावणार’ असे वक्तव्य केले होते.
यामुळे सुशिक्षित मराठा पिढीच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम झाला आहे, असा आरोप करत सकल मराठा समाजाच्या धरणे आंदोलनाच्या ठिकाणी विडंबनात्मक फलक उभा करून अभिनव निषेध करण्यात आला.
दसरा चौकात कार्यकर्त्यांनी ‘अजित पवारांची हकालपट्टी करा’, ‘मराठा आरक्षण आमच्या हक्काचे’ अशा घोषणांनी परिसर दुमदूमून टाकला. गेले पन्नास दिवस सकल मराठा समाजाच्या वतीने (Maratha Community) आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला विविध संस्थांचा पाठिंबा मिळत आहे.
अधिवेशनात पीएच.डी. विद्यार्थ्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना वसंतराव मुळीक यांनी, सारथी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी असे उद्गार निषेधार्ह असल्याचे सांगितले. विद्यार्थी आपली गुणवत्ता सिद्ध करूनच फेलोशिप घेत असतात. मात्र या विधानाने अशा विद्यार्थ्यांच्या आपल्या मागण्या प्रशासनाकडून पूर्ण होईल या अपेक्षाच लोप पावल्या आहेत. पण सकल मराठा समाज या विद्यार्थ्यांच्या मागे सक्षमपणे उभा आहे, असे सांगितले.
ॲड. बाबा इंदुलकर यांनी, ‘मोठ्या कष्टाने मनोज जरांगे -पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उभे केलेले आंदोलन विविध बाजूंनी घेरण्याचा व मोडीत काढण्याचा शासनाचा डाव असल्याची टीका केली. या वेळी ‘सारथी’तून पीएच.डी. करणारे संभाजी खोत, ऋषीराज भोसले, मयूर भारमल, सौरभ पोवार, स्वप्नील पवार उपस्थित होते.