ताज्या बातम्या

मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नव्हे, त्यामुळे पगारी सुट्टीची गरज नाही


मासिक पाळीच्या काळामध्ये महिलांना प्रचंड वेदनांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत देखील त्यांना काम करावे लागते. त्यामुळे मासिक पाळीच्या काळामध्ये महिलांना भर पगारी सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

यासाठी ‘भरपगारी मासिक पाळी रजा धोरणा’ लागू करण्यावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. मात्र, बुधवारी याच धोरणाला केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी विरोध दर्शवला आहे. यावेळी बोलताना, “मासिक पाळी आल्याने स्त्रीला अपंगत्व येत नाही, त्यामुळे पगारी सुट्टी योजनेची गरज नाही” असे मत स्मृती इराणी यांनी मांडले आहे.

बुधवारी राज्यसभेमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा यांनी स्मृती इराणी यांना मासिक पाळी धोरणासंदर्भात एक प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना स्मृती इराणी म्हटल्या की, “एक मासिक पाळी येणारी स्त्री म्हणून मी सांगू इच्छिते, की मासिक पाळी म्हणजे काही दिव्यांगत्व नाही, हा स्त्रियांच्या जीवन प्रवासाचा एक नैसर्गिक भाग आहे. स्त्रियांना समान संधी नाकारल्या जातील, अशा गोष्टी आपण मांडू नयेत. कारण ज्यांना मासिक पाळी येत नाही, अशा व्यक्तीचा मासिक पाळीबद्दल विशिष्ट दृष्टिकोन असतो”

त्याचबरोबर, “अत्यल्प महिला किंवा मुली गंभीर डिसमेनोरिया किंवा तत्सम तक्रारींनी ग्रस्त आहेत. यापैकी बहुतेक जणींचा त्रास औषधोपचाराने आटोक्यात आणता येतो. मासिक पाळीचा प्रश्न आणि त्याच्याशी संबंधित गोष्टींबाबत मौन पाळलं जातं. अनेकदा महिलांना लज्जास्पद वागणूक दिली जाते. मासिक पाळीकडे सोशल टॅबू म्हणून पाहिले जाऊन बर्‍याच वेळा महिलांचा छळ होतो, त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते किंवा त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जातो” असे स्मृती इराणी यांनी म्हणले.

तसेच, “मासिक पाळीच्या रजेमुळे अन्य कर्मचाऱ्यांमध्ये महिलांविरुद्ध भेदभाव निर्माण होऊ शकतो. मासिक पाळी येत नाही अशा महिलांना ही संधी नाकारली जाईल ज्यामुळे हा एकप्रकारचा भेदभाव ठरेल” असा युक्तिवाद स्मृती इराणी यांनी खासदार मनोज कुमार झा यांच्या प्रश्नांचे उत्तर देताना केला. दरम्यान, मासिक पाळीच्या काळामध्ये महिलांना सुट्टी देण्यात यावी की नाही याबाबत संपूर्ण देशभरात वेगवेगळी चर्चा सुरू आहे. अशातच यासंदर्भात केंद्र सरकार काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button