प्रवाशांचा जीव टांगणीला,35 प्रवासी घेऊन जाणारी खासगी बस पुरात अडकली

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा तालुक्यात चिचोली येथील नाल्यावर 35 प्रवासी घेऊन जाणारी खासगी बस पुरात अडकली. दरम्यान पुरात अडकल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला असताना विरूर पोलिसांनी जिवाची पर्वा न करता खासगी बसमधील 35 प्रवाशांना बाहेर काढले आहे.
जिल्ह्यात पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने नदी नाले फुगले आहेत. सर्वत्र पुराचा विळखा पाहायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा तालुक्यातील चिचोली मार्गे मध्यप्रदेशसह विविध भागातून येणारी खासगी वाहने या मार्गाने हैद्राबाद येथे जातात. जवळचा मार्ग म्हणून या मार्गाचा वापर होतो. राजूरा चिचोली मार्गावरील नाल्याला पूर आला आहे. आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास हैद्राबादला जाण्यासाठी खासगी बस निघाली होती. परंतु या मार्गावर पूर असल्याने चालकाला या मार्गाने बस नेऊ नये, अशा सूचना पोलिसांनी केल्या होत्या. मात्र, बस चालकाने पोलिसांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून या मार्गाने बस जबरदस्तीने घातली. पण पाणी जास्त असल्याने बस नाल्यात बंद पडली. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड आरडाओरड सुरू झाली. वेळ पहाटेची होती. मात्र, तो पर्यंत चिचोली येथील नागरिक जागे झाले होते. सदर घटना त्यांच्या लक्षात आली. गावकऱ्यांनी घटनास्थळी येऊन विरूर स्टेशन पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.

विरुर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन गावकऱ्यांच्या मदतीने बसमधील 35 प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यु केले. बराच वेळांनी एकानंतर एकाला पुरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले. त्यामुळे 35 प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास घेतला. तर विरूर पोलिसांचे आभार मानले.