ताज्या बातम्या

कार्तिकीनिमित्त सहाव्यांदा केली विठूरायाची महापुजा,’शेतकऱ्यावरील संकट दूर व्हावं’फडणवीसांचं विठुरायाला साकडं,


कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापुजा संपन्न झाली. पंढपूरात शासकीय महापुजा करण्याची ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहावी वेळ आहे.

कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा आज लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित पंढरीत पार पडतोय. कार्तिकी यात्रेच्या पूर्वसंध्येला पंढरीत सुमारे 4 लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. शासकीय महापुजेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बुधवारी सायंकाळीच पंढरपुरात आगमन झालं. नियोजित वेळेप्रमाणे त्यांनी पहाटे 02:15 वाजता सपत्नीक श्री विठ्ठल आणि रखुमाईच्या महापूजेला सुरुवात केली. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा, शेतकऱ्यावरील संकट दूर व्हावं, पावसामुळं चिंताग्रस्त शेतकऱ्यांना धीर व समाधान देण्याची शक्ती विठुरायानं आम्हाला द्यावी, अशी प्रार्थना फडणवीसांनी विठुरायाकडं केल्याचं त्यांनी सांगितलंय. देवेंद्र फडणवीसांची पंढरपुरात शासकीय महापूजा करण्याची, विठु-माऊलीचं सपत्नीक दर्शन घेण्याची ही सहावी वारी आहे. त्यामुळं या सहाही वारीसाठी आम्हाला विठ्ठल-रखुमाईच्या महापुजेची संधी दिली, त्याबद्दल त्यांनी मंदिर समितीचे आभार मानले.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पुजेनंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी मागणं मागितलं. तसंच मागणं मी विठुराया चरणी करतो. सर्वांना सुखी ठेवण्याची, समाधानी ठेवण्याची शक्ती माऊलीनं आम्हाला द्यावी, असंही फडणवीस यांनी म्हटलंय. यावेळी, त्यांनी विठ्ठल मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाचे आभारही मानले. यावेळी पंढरपूरात कार्तिकी एकादशीनिमित्त राज्यभरातून मोठ्या प्रमाणात वारकरी दाखल झाले आहेत.

वारी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर : पुढं बोलताना फडणवीस म्हणाले, कोणाला विस्थापित करायचा आमचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाव नाही. आमची वारी ही आता आमची वारी राहिली नाही, तर ही वारी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली आहे. त्यामुळं इथं व्यवस्था देखील तशाच पद्धतीनं उपलब्ध असली पाहिजे. इंद्रायणी स्वच्छ आणि अविरत वाहिली पाहिजे, यासाठी देखील आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी वेळ लागेल मात्र आपण सुरुवात केलीय. इंद्रायणीमध्ये सोडलं जाणारं पाणी हे स्वच्छ करुनच त्यात गेलं पाहिजे, यासाठी प्रयत्न आपण सुरु केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button