‘ओबीसींचा हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात मिळावे झाले पाहिजेत
ओबीसी नेत्यांनी मराठवाड्यातील जालन्यात ओबीसींचा मेळावा घेत आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, अशी भूमिका ठामपणे घेतली आहे.
आता दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सरकार मात्र कात्रित सापडलं असल्याची चर्चा रंगली आहे.
जालन्यातील आंबड येथे शुक्रवारी ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ओबीसी नेते छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, गोपिनाथ पडळकर यांच्यासह विविध पक्षांतील ओबीसी नेते एकाच मंचावर एकत्र आले होते. यावेळी ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही, मात्र कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असा इशारा दिला. ओबीसी समाजातून येणाऱ्या नेत्यांनी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी एकत्र लढा देऊ, अशी स्पष्ट भूमिका मांडली.
यावेळी छगन भुजबळ यांनी ‘ओबीसींचा हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात मिळावे झाले पाहिजेत. ओबीसींची संख्या जास्त असून महाराष्ट्रातही जातीय जनगणना ताबडतोब झाली पाहिजे’, अशी मागणी केली.
आपल्या भाषणात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा उल्लेख देखील भुजबळांनी केला. पोलिसांचा लाठीचार्ज सगळ्यांनी पाहिला, पण 70 पोलीस दगडफेकीत जखमी झाले, ते कोणी पाहिले नाही. पोलीस जरांगेंना आंदोलनस्थळावरून उठवण्यास गेले तेव्हा त्यावेळी जरांगे यांनी सर्व तयारी केली होती, पोलिसांवर दगडाचा मारा सुरू झाला. 70 पोलीस पाय घसरून पडले का त्यांना कोणी मारले? महिला पोलिसांवर दगडफेक केली, असा आरोप भुजबळांनी केला. ‘राज्यापुढे खरं चित्र आलं नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनीच माफी मागितली आणि गुन्हे मागे घेण्याचं जाहीर केलं. त्यामुळे पोलिसांचे मनोबल खचलं’, असं म्हणत भुजबळांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील लक्ष्य केलं.