महाराष्ट्र

बीडमध्ये झालेल्या हिंसाचाराची घटना अतिशय दुर्दैवी,पंकजा मुंडेंचाही ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध


बीडमध्ये झालेल्या हिंसाचाराची घटना अतिशय दुर्दैवी आहे. आरक्षणाच्या लढाईत धाक निर्माण करू शकतो, पण भीती निर्माण करू शकणार नाही. अशा घटना पुन्हा महाराष्ट्रात होऊ नये, ओबीसीतून आरक्षण न देता संविधानामध्ये बसेल व टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला दिले पाहिजे.केवळ शब्द आणि मुदतवाढीचा खेळ करून चालणार नाही, अशी भूमिका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मांडली. बीडमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनास्थळी त्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुंडे पुढे म्हणाल्या, लढाई कोणती असो त्यात धाक निर्माण करता येईल पण भीती निर्माण करता येणार नाही. धनगर समाज एसटी प्रवर्गातून आरक्षण मागत आहे. मग आदिवासी त्यांना या-या असे म्हणणार आहेत का?

त्यामुळे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये, त्यांना टिकणारे व संविधानात बसेल असे आरक्षण दिले पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

जालन्यातील अंतरावाली सराटी या ठिकाणी झालेल्या मारहाणीची आणि बीडमधील जाळपोळीच्या घटनेची चौकशी झाली पाहिजे. एवढी मोठी घटना घडून जर इंटिलिजन्सला माहिती होत नसेल तर हे त्यांचे फेल्युअर म्हणावे लागेल, अशी टीका पंकजांनी केली.

बीडमध्ये ज्या लोकांच्या घरावर हल्ले झाले. तेव्हा आतमध्ये अडकलेल्या लोकांना आजूबाजूला असलेल्या विविध जातीच्या धर्माच्या लोकांनी लोकांना बाहेर काढले. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण अशाप्रकारे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे.

राज्यात आपल्या आंदोलनामुळे काय घडते. याचा विचार झाला पाहिजे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. तसेच, मी मंत्री जरी नसले. माझ्या नावाच्या मागे मंत्रीपद जरी नसेल तरीही मी या जिल्ह्याचे पालक आहे.

मी आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर प्रशासकीय अधिकारी व पोलिसांशी संवाद साधून येथील परिस्थिती सांगणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

जरांगे पाटलांना इशारा !

जर अशा प्रकारच्या घटना घडत असेल तर आमचा विरोध कायम राहणार आहे. मी सद्या एखाद्या गोष्टीपासून अलिप्त आहे. असे कोणाला वाटते असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. आमच्या मनात कायम वंचित, पिडीतांचा प्रश्न आहे.

त्या समाजाच्या पाठिशी उभा राहण्यासाठी आम्ही वेळप्रसंगी आमरण उपोषण करत राहू, यात काही शंका नाही. शांतताप्रिय व संविधानात्मक मार्गाने आंदोलन झाली पाहिजे, अशा पद्धतीने घटना घडत राहिल्या तर त्या चांगल्या नाहीत.

कोणत्या आंदोलनाची लढाईत तुमची डेडलाईन ही सामान्य जनतेसाठी नसावी. ज्यामुळे लोकांना त्याचा त्रास होईल. असे अजिबात होता कामा नये, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी जरांगे पाटील यांना इशाराच दिला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button