ताज्या बातम्या

हातकणंगले मतदारसंघात तीन एमआयडीसी होणार, खासदार धैर्यशील माने यांनी दिली माहिती


इचलकरंजी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये अकिवाट येथे २५० एकर जागेवर टेक्स्टाइल झोन, तर अन्य तीन ठिकाणी एमआयडीसी सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी जमीन संपादनाची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सातारा येथून म्हसवड मार्गे बंगळुरूकडे जाणार आहे. असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील गावांचा विकास झाला पाहिजे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तीन एमआयडीसी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील आवळी, डोनोली मिळून एक आणि खसातळी याठिकाणी दुसरे असे दोन, तर शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे एक एमआयडीसी होणार आहे. त्यासाठी ९० एकर जागा संपादित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.



 

अकिवाट येथे टेक्स्टाइल झोन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २५० एकर जागा आरक्षित केली आहे. या टेक्स्टाइल झोनमध्ये वस्त्रोद्योगाशी संबंधित प्रोसेसर्स, सायझिंग, आदी सर्व उद्योगधंदे एकाच ठिकाणी येतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. सांगली जिल्ह्यातील आष्टा या ठिकाणीही एमआयडीसी होणार आहे. मल्टी मॉडेल लॉजेस्टिक पार्कचे कामही गतीने सुरू आहे. केंद्रीय मंत्र्यांनी त्यामध्ये लक्ष घातले आहे. गावामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी उद्योगाशिवाय पर्याय नाही. निवडणुकीमध्ये दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माने यांनी सांगितले.

 

सरकारवर परिणाम नाही

 

आम्ही भाजपसोबत गेल्याने केंद्रातील सरकार पडलेही नसते आणि तरलेही नसते. कोणताही परिणाम या सरकारवर झाला नसता. मात्र, आम्ही सामान्य लोकांना दिलेला विकासाचा शब्द पाळण्यासाठी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मग त्यासंदर्भात काहीही आरोप झाले तरी त्याची पर्वा नाही. जर मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर सत्तेशिवाय पर्याय नाही, असे माने यांनी स्पष्ट केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button