ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे गटाला चपराक


एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी शिवसेनेतून बाहेर पडत अर्थात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले. त्यानंतर गेले वर्षभर एकनाथ शिंदे आणि या आमदारांवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि या गटातील अन्य नेत्यांकडून सातत्याने अपमानास्पद भाषेचा वापर केला गेला.उद्धव ठाकरे गटाची सभा असो की महाविकास आघाडीच्या सभा असोत की, कार्यकर्त्यांचे मेळावे असोत, शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांवर टीकेची झोड उठविण्यात आली. त्यांना गद्दार, खोकेवाले, खोकासूर, विश्वासघातकी अशी अनेक शेलकी विधाने वापरून अपमानित करण्यात आले. काही सभांमधून हे झाले असते तर त्याबद्दल फारसे काही कुणाला वाटले नसते पण प्रत्येक सभेत केवळ तीच विधाने, तीच शेलकी आणि कुचकट भाषा यांचा वापर होत राहिला.

 

बेकायदा, घटनाबाह्य सरकार, मिंधे सरकार म्हणून हिणवण्यात आले. मात्र त्यातून साध्य काय झाले तर एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा, दरी वाढतच गेली. आज या दोन गटात कमालीचे वैर निर्माण झाले आहे. एकप्रकारे एकमेकांचे ते शत्रू आहेत की काय अशी भावना निर्माण झाली आहे. हे दोन्ही गट कधीही एकमेकांसमोर येण्याचीही शक्यता दिसत नाही. त्यामुळे ते कधी एकत्र येतील ही शक्यताच नाही.

 

याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या काही आमदारांसह वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शरद पवारांपासून फारकत घेत थेट सत्तेत सामील होण्याचे ठरविले. जुलै महिन्यात त्यांचा शपथविधी पार पडला. त्यावेळी अजित पवारांनाही त्यांच्या गटातील नेते, कार्यकर्ते अशीच वागणूक देतील अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली पण असे अजिबात घडले नाही.

 

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वाच्या दहशतवादी हल्ल्यात ११ कामगार ठार !

 

राहुल गांधींना स्मृती इराणी म्हणाल्या. ‘ते तर पक्षाचे मालक, मी माझ्या पक्षाची कार्यकर्ती’

 

फक्त २५ किमी; चंद्राच्या सर्वांत जवळच्या कक्षेत पोहोचले लँडर विक्रम

 

केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या आईचे मंगळसूत्र चोरटयांनी पळवले !

 

उलट अजित पवार वेगळे झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट यशवंतराव चव्हाण केंद्रात घेतली. सोबत काही आमदारही होते. या आमदारांनी शरद पवारांची विचारपूस केली, पवारांनीही त्यांची विचारपूस केली. त्यात कुठेही कडवटपणा नव्हता हे वारंवार दिसले. दोनवेळा अशी भेट झालेली असतानाही त्यात कुठेही दोन्ही गटातील संबंध विकोपाला गेले आहेत असे दिसले नाही. मध्यंतरी अजित पवार आणि शरद पवारांची त्यांचे मित्र चोरडिया यांच्या घरी भेट झाली. त्यामुळेही टीका झाली पण अजित पवार हे पुतणे आहेत आणि त्यांना भेटण्यात गैर काय, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला. मात्र त्यांच्याकडून कुठेही अजित पवार यांच्यावर शरसंधान करण्यात आले नाही. टीका झाली तरी ती नाती ताणली जातील एवढी टीकाही केली गेली नाही.

 

त्याचसंदर्भात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र टीका करताना आता अजित पवारांना शरद पवारांचे वर्चस्व असलेल्या संस्थांमधून काढले पाहिजे, अशी भूमिका घेण्यात आली. त्यावर जेव्हा पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारले तेव्हा मात्र त्यांनी अजित पवारांवर टीका करण्याऐवजी संजय राऊत यांचेच शब्द कसे बाळबोध आहेत, टीका करणाऱ्यांवर हसावे की रडावे असा प्रश्न पडतो, असे विधान करून एकप्रकारे चपराकच लगावली. आमच्यात कोणतेही मनभेद नाहीत असतील तर ते केवळ मतभेद ही सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया होती. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या पुढे म्हणतात की, आम्ही नाती जपतो. केवळ आमच्यातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरही विविध पक्षांशी, नेत्यांशी आमचे ऋणानुबंध आहेत, ते आम्ही जपतो. या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाला त्यांनी सणसणीत चपराक लगावली, आरसा दाखवला असे म्हणता येईल.

 

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार वेगळे झाले. त्यानंतर संताप येणे, चीड येणे स्वाभाविक होते पण वर्षानुवर्षांचे नाते तोडले गेले. त्यांच्यावर नको नको ते आरोप करून जणू काही ते आपले शत्रू आहेत, अशी भावना वारंवार व्यक्त केली गेली. अगदी एकनाथ शिंदे यांच्यापेक्षाही वयाने लहान असलेल्या आदित्य ठाकरे यांनीही शिंदे यांच्याबद्दल काहीबाही बोलण्याचा धडाका लावला. एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे आमदार यांचेही शिवसेनेच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. त्यांनीही आर्थिक पाठबळ पक्षाला दिलेले आहे. मात्र त्यांनी पक्षापासून फारकत घेतल्यावर जणू काही त्यांनी भ्रष्टाचार केल्याच्या थाटात टीका केली गेली तेव्हा याच सुप्रिया सुळे यांची ही नीती उद्धव ठाकरे गटाने लक्षात ठेवायला हवी होती.

 

ती लक्षात ठेवली गेली नाही. जो पक्ष सोडेल तो तात्काळ भ्रष्ट आणि खोक्यांचा सम्राट असल्याच्या थाटात त्यांच्यावर टीका केली गेली. ती केल्यामुळे आज शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायमचे वितुष्ट निर्माण झाले. शरद पवार आणि त्यांच्यासोबत असलेले नेते अजित पवारांवर टीका करतील निदान आपल्या बाजूने उभे राहतील, आपण करत असलेल्या टीकेला उचलून धरतील अशी संजय राऊत यांची अपेक्षा असावी, पण तसे झालेले नाही. त्यातून हे दिसून आले की, राजकारण एकीकडे पण नातीगोती, ऋणानुबंध वेगळीकडे. आरसा दाखविणे यालाच म्हणतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button