भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण फडणवीसांमध्ये.”; ठाकरे गटाचा हल्लाबोल, म्हणाले.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच फडणवीसांच्या मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री प्रवासावर भाष्य करत टोला लगावला आहे.“भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. ‘उप’ची नशा ही ‘देशी’ बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय,” असं ठाकरे गटाने म्हटलं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात हे मत व्यक्त करण्यात आलं.
ठाकरे गटाने म्हटलं, “देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली आणि ते अहंकाराचे महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. ते अनेकदा अर्धग्लानी अवस्थेत असल्याने रामप्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही. भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. ‘उप’ची नशा ही ‘देशी’ बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांड्या जात आहेत. फडणवीस, सांभाळा.”
“झोपलेल्यांना जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेऊन पडलेल्यांना जागे कसे करायचे, हा प्रश्न नेहमीच असतो. महाराष्ट्रात सध्या हा प्रश्न निर्माण झाला आहे तो भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत. एक आपले मुख्यमंत्री, ते ‘सहसा झोपत नाहीत. दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस, ते सदैव अर्धग्लानी अवस्थेत आहेत. “मी पुन्हा येईन, असे म्हणालो होतो. बोलल्याप्रमाणे तसेच झालेही होते, परंतु काही लोकांनी गद्दारी केली तरीही मी आलोच,” असे फडणवीस यांनी पुनः पुन्हा, पुनः पुन्हा सांगितले. ही त्यांची अर्धग्लानी अवस्था आहे,” अशी टीका ठाकरे गटाने केली.
ठाकरे गटाने पुढे म्हटलं, “गेल्या वर्षभरात त्यांचे हे ‘पुनः पुन्हा’ प्रकरण इतक्या वेळा झाले आहे की, जनतेच्या शब्दकोशातून ‘पुन्हा’ हा शब्द बाद होण्याची शक्यता आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार होते, पण त्यांच्या हायकमांडने त्यांना ‘उप’ म्हणून पुन्हा पाठवले. आज हे ‘उप’ एका अननुभवी, बेईमान, भ्रष्ट माणसाच्या हाताखाली काम करीत आहेत. मी येणारच होतो, पण काही लोकांनी बेईमानी केली म्हणून मध्येच लटकलो, पण तरीही आलो. या त्यांच्या बोलण्यात इमानदारीचा जोश नाही.”
“आता २०१९ साली बेईमानी कोणी केली, हे महाराष्ट्र जाणतो. फडणवीस व त्यांचा पक्ष अर्धग्लानीत असला, तरी महाराष्ट्राची जनता झोपेत नाही. बेईमानी केली ती भाजपाच्या सध्याच्या दिल्लीश्वरांनी. सत्तेचे वाटप समसमान करण्याचा शब्द देऊन तो फिरवण्यात आला आणि फडणवीस हे त्याचे साक्षीदार आहेत. ही बेईमानी तेव्हा झाली नसती, तर महाराष्ट्रात फडणवीस सन्मानाने पुनः पुन्हा आलेच असते. यामुळे फौजदाराचा जमादारही झाला नसता हे सत्य ‘प्यारे’ फडणवीस नाकारू शकत नाहीत. २०१९ च्या बेईमानीमुळेच शिवसेना-भाजपाची युती तुटली,” असा आरोप ठाकरे गटाने केला.