ताज्या बातम्या

भीष्म पितामहांकडून ही अपेक्षा नाही”, संजय राऊतांनी थेट शरद पवारांना केलं लक्ष्य ! नेमकं काय झालं?


राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे सत्ताधारी भाजपा, शिंदे गट व नुकताच सत्तेत दाखल झालेला अजित पवार गट विरोधकांच्या मुद्द्यांना फेटाळून लावत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडूनही अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरलं जात आहे.



नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद पाहायला मिळाले. मात्र, आता एका भेटीमुळे राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत आत्तापर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी केलेल्या अजित पवारांनी काका शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट गुप्तपणे झाल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यावर दोन्हीकडच्या नेत्यांनी कौटुंबिक नात्यांसाठी भेट झाल्याचं स्पष्टीकरण दिलं. मात्र, या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये वादाचा खडा पडतोय की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे.

शरद पवार व अजित पवार यांची भेट!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी जाहीरपणे शरद पवारांवर टीका केली आहे. तसेच, त्यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत आता त्यांनी निवृत्त होऊन फक्त मार्गदर्शन करावं, असा सल्लाही अजित पवारांनी जाहीरपणे शरद पवारांना दिला. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाचे कार्यकर्ते व नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलेलं असताना दुसरीकडे शरद पवार व अजित पवारांनी एका व्यावसायिकाच्या घरी एकमेकांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या भेटीमुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहाता शरद पवारांनी स्पष्टीकरण देताना “अजित पवार माझे पुतणे आहेत. त्यांनी भेट घ्यायला काय हरकत आहे”, अशा आशयाचं विधान केलं. त्यापाठोपाठ रोहित पवारांनीही राजकारणात नातीगोती सांभाळण्यासंदर्भात केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवारांनाच लक्ष्य केलं आहे.

काका-पुतण्या भेटीवर काँग्रेस-ठाकरे गटाची चर्चा

“नाना पटोले मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडे आले. तिथे मी, आदित्य ठाकरेही हजर होते. परवा त्या दोघांमध्ये (अजित पवार, शरद पवार) जी बैठक झाली, त्यावर मातोश्रीवर चर्चा झाली. महाराष्ट्रात वारंवार संभ्रमाचं वातावरण निर्माण होतंय. त्यामुळे महाविकास आघाडीवर होणाऱ्या परिणामावर चर्चा झाली”, असं राऊत म्हणाले.

“रोहितजी, आपला पक्ष.”, संजय शिरसाटांची रोहित पवारांवर टीका; म्हणाले, “ठाकरे गटाचे प्रवक्ते.”

“रोहित पवार, शरद पवार यांची वक्तव्य मी पाहिली. शरद पवार म्हणाले ते माझे पुतणे आहेत. असू शकतात. रोहित पवारांचंही नातीगोती सांभाळायची वगैरे वक्तव्य ऐकलं. पण मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचं? हा प्रश्न आहे. उद्या जर आम्ही एकनाथ शिंदेंबरोबर किंवा त्यांच्या बेईमान गटाबरोबर रोज चहा प्यायला बसायला लागलो तर काय होईल? आम्ही नेत्यांनी त्यांच्याबरोबर बसायचं, नातीगोती पाळायची आणि खाली कार्यकर्त्यांनी मग आपल्या विचारसरणीसाठी एकमेकांविरोधात लढायचं? मला वाटतं शिवसेनेच्या डीएनएमध्ये असं ढोंग नाही”, अशा शब्दांत या भेटीवर संजय राऊतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

“ही लढाई देशाची आणि राज्याची आहे. त्यात महाभारताप्रमाणे स्वकीय, मित्र, नातीगोती यांची पर्वा आम्हाला करता येत नाही. महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाचं अस्तित्व टिकवण्याची ही लढाई आहे. लोकांमध्ये संशय आणि संभ्रम येईल अशी भूमिका किमान भीष्म पितामहांकडून तरी अपेक्षित नाही. आमची भूमिका त्या बाबतीत स्पष्ट आहे. नातीगोती, प्रेम घरात. या राज्यासमोर आव्हान उभं करण्यात आलं आहे. चुकीच्या लोकांबरोबर हातमिळवणी करून जर कुणी आम्हाला आव्हान देत असेल, तर ते आमचे नातेवाईक नाहीत”, अशा शब्दांत संजय राऊतांनी थेट शरद पवारांना कानपिचक्या दिल्या आहेत.

शरद पवार हे आमचे नेते आहेत – संजय राऊत

“शरद पवार हे आमच्या सगळ्यांचे नेते आहेत. मविआचे नेते आहेत. इंडिया आघाडीचे नेते आहेत. ते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत. त्यांची एक संवादाची भूमिका असते. ती आम्हीही घेतो. पण ती कुणाबरोबर आणि कधी घ्यावी? त्या भूमिकेचा आपण करत असलेल्या राजकारणावर काय परिणाम होईल याचा आम्ही विचार करतो. एकनाथ शिंदेंबरोबर आमची फार चांगली मैत्री होती. अनेक वर्षांपासूनचा दोस्ताना होता. राज ठाकरेंबरोबर आमचा दोस्ताना होता. ही नाती असतात. पण राजकारणात जेव्हा आपले मार्ग वेगळे होतात, तेव्हा मतदारांच्या मनात संभ्रम राहू नये, याची काळजी प्रमुख नेत्यांनी घ्यायची असते ही आमची भूमिका आहे. बाकी ज्याला जे पटेल त्यानं ते करावं”, असंही संजय राऊतांनी यावेळी नमूद केलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
  • .
Back to top button