मोठी गर्दी! स्वस्त टोमॅटोच्या खरेदीसाठी दिल्लीकरांची झुंबड, 2 दिवसांत 71 हजार किलोची विक्री
टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे टोमॅटो स्वयंपाकघरातून गायब झाला होता. दरम्यान, दिल्ली-एनसीआरमधील जनतेला दिलासा दिला. सरकारने इतर राज्यांतून टोमॅटो खरेदी करून स्वस्तात उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू केली.
याचाच परिणाम असा झाला की, दिल्लीतील लोकांमध्ये स्वस्तात टोमॅटो विकत घेण्यासाठी अशी झुंबड उडाली की अवघ्या दोन दिवसांत तब्बल 71 हजार किलोंहून अधिक टोमॅटो विकले गेले. नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) ने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) ने रविवारी राजधानी दिल्लीत टोमॅटोच्या विक्रीची आकडेवारी सादर करताना सांगितले की, ग्राहकांना वाढलेल्या किमतीपासून दिलासा देण्याच्या उद्देशाने दोन दिवसीय मेगा सेलचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीत 71,500 किलो टोमॅटो विकले गेले. ही टोमॅटो विक्री दिल्लीतील सीलमपूर आणि आरके पुरम अशा 70 वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
सर्वाधिक टोमॅटो 12 ऑगस्ट रोजी विकले गेले
एनसीसीएफच्या म्हणण्यानुसार, स्वस्त दरात टोमॅटो खरेदी करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती आणि 12 ऑगस्ट रोजी टोमॅटोची सर्वाधिक विक्री झाली. या एका दिवसात लोकांनी 36,500 किलो टोमॅटोची खरेदी केली. दुसऱ्या दिवशी, रविवारी, 13 ऑगस्टला दिल्लीतील लोकांनी 35,000 किलो टोमॅटो खरेदी केले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गगनाला भिडलेल्या किमतींमध्ये टोमॅटो सरकारकडून 70 रुपये किलो या सवलतीच्या दराने लोकांना विकला जात आहे.
गेल्या महिनाभरात टोमॅटोच्या भावात झालेली वाढ हा चर्चेचा विषय बनला होता. देशातील विविध राज्ये आणि शहरांमध्ये टोमॅटोचे दर किलोमागे 300 रुपयांच्या आसपास पोहोचले होते. हे लक्षात घेऊन, गेल्या 11 जुलैपासून, NCCF ने देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किमती नियंत्रित करण्यासाठी अनुदानित दराने टोमॅटोची विक्री सुरू केली आहे. सततच्या हस्तक्षेपामुळे आता देशातील जवळपास सर्वच ठिकाणी किमती कमी होत असल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.