ताज्या बातम्या

भारत ‘गुलाम’ का बनला?


माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी एक किस्सा नेहमी सांगत असत. परराष्ट्रमंत्री असताना अटलजी अफगाणिस्तानात गेले होते. तेथील परराष्ट्रमंत्र्यांकडे त्यांनी गझनीला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.

ते म्हणाले, “गझनीला कशासाठी जायचे? ते काही पर्यटनस्थळ नाही. बरे म्हणावे असे हॉटेलही तेथे नाही!” अटलजींनी कारण दिले नाही; पण जिथल्या एका लुटारूने, मोहम्मद गझनीने १७ वेळा भारतावर हल्ला केला आणि मोजदाद करता येणार नाही इतकी संपत्ती लुटून नेली, ती गझनीची भूमी त्यांना पाहायची होती.

त्यांच्या त्या गझनी प्रवासाबद्दल बोलताना अटलजी फार गंभीर होत, मोहम्मद गझनीनंतर तैमूरलंग, नादिर शाह आणि त्याच्यानंतरही येथे आलेल्या लुटारूंचा सामना हा देश करू शकला नाही; कारण आपण विखुरलेले होतो. समाज इतका विभागलेला होता की लढाई लढण्याची जबाबदारी केवळ क्षत्रियांची मानली जात असे. अवघा देश हिमतीने उभा राहिला असता, तर सोन्याचा धूर निघणाऱ्या देशात लक्षावधींची कत्तल करून रक्ताचे पाट वाहवण्याची हिंमत हे लुटारू करू शकले असते? त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीला आपल्यावर कब्जा करता आला असता? आपण ब्रिटिशांचे गुलाम झालो असतो?

आज अटलजी आपल्यात नाहीत. स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी १६ ऑगस्टला त्यांची पुण्यतिथी येते. युक्रेनमधल्या घडामोडी पाहताना मला अटलजींची आठवण येते. रशियाच्या तुलनेत युक्रेन अतिशय छोटा देश ! रशियाइतकी मोठी साधनसंपत्ती त्या देशाकडे नाही. रशियाच्या तुलनेत त्याची युद्धाची क्षमताही नगण्या तरीही तो देश खमक्या एकजुटीने रशियाविरुद्ध ठामपणाने उभा आहे. घर सांभाळणाऱ्या स्त्रियासुद्धा हातात शस्त्रे घेऊन लढाईला उतरल्या आहेत.

व्हिएतनाम नावाच्या छोट्याशा देशाने आपली एकजूट दाखवून महाबलाढ्य अमेरिकेला गुडघे टेकायला भाग पाडले होते. अमेरिकेला लढाईचे मैदान सोडून पळून जावे लागले होते. भारताचा ब्रिटिशकालीन इतिहास पाहा आपल्यामध्ये फूट होती म्हणून हा देश गुलामीकडे ढकलला गेला. ईस्ट इंडिया कंपनी हातात शस्त्रे घेऊन हिंदुस्तानमध्ये आली नव्हती. भले कंपनीचे उद्दिष्ट हिंदुस्तानला गुलाम करण्याचे असेल; परंतु, त्यांची सुरुवातीची पावले तर व्यापार करण्याचीच होती. या देशातली छोटी मोठी असंख्य साम्राज्ये, त्यांचे राजे, जाती धर्म भाषा यात विभागला गेलेला, आपापसात न पटणारा समाज हे चित्र पाहून आपण या देशावर राज्य करू शकतो, हे ब्रिटीशांनी हेरले! त्यांनी राजे लोकांमध्ये वैमनस्य वाढवले. राजेमंडळी त्या सापळ्यात अडकली आणि ईस्ट इंडिया कंपनीने हळूहळू आपले सैन्य उभे केले.

१७५७ साली प्लासीच्या लढाईत बंगालचा नबाब सिराज उद्दौला याच्या सेनेला हार खावी लागली. बंगालवर ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य प्रस्थापित झाले. त्यानंतर भारताचा उरलेला भागही गुलाम होत गेला. केवळ गोवा आणि पाँडिचेरीमध्ये पोर्तुगालचे राज्य होते. याचा अर्थ तेही प्रदेश गुलामच होते. असे समजा आपल्या देशातल्या विभिन्न प्रदेशातील राजे ब्रिटिशांविरुद्ध एकजुटीने उभे ठाकले असते तर? ईस्ट इंडिया कंपनी बंगालवर कब्जा मिळवू शकली असती?

प्लासीच्या लढाईनंतर १०० वर्षांनी १८५७ साली झालेली क्रांती असफल झाली; याचेही कारण भारतातील संस्थानांचा आपापसातील वैरभाव ! ही संस्थाने इंग्रजांची मांडलिक झाली होती. भारताचा इतिहास योद्ध्यांच्या वीरश्रीयुक्त कहाण्यांनी भरलेला आहे; परंतु धोकेबाज मंडळींची संख्याही इथे कमी नाही. आपला देश कधीकाळी अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत पसरलेला होता; परंतु आपसातील फाटाफुटीने त्याचे विघटन झाले.

बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी दक्षिण आफ्रिकेतून परतले तेव्हा त्यांनी स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले. त्यावेळी विखुरलेल्या भारतीय समाजाचे करूण दृश्य त्यांच्यासमोर होते. समाज खूप तुकड्यांत वाटला गेलेला होता. एक मोठा वर्ग अस्पृश्य ठरवून सामाजिक गुलामीच्या साखळदंडातून जखडून ठेवला गेला होता. सर्वात पहिला प्रहार जातीवादावर करताना गांधीजी म्हणाले, “माणूस तर माणूस आहे. मग तो अस्पृश्य कसा असू शकेल?” सामाजिक षड्यंत्रे नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी स्वतः मैल्याची पाटी उचलली. जाती, धर्म आणि भाषा ओलांडून सगळा देश त्यांच्याबरोबर चालू लागला. सामाजिक एकतेमध्ये लपलेली ताकद सामान्य माणसाच्या गळी उतरवणारे गांधीजी हे पहिले राष्ट्रनायक! शस्त्रास्त्रांच्या बळावर ब्रिटिश राज्यकर्त्यांशी लढता येणार नाही हे त्यांना ठाऊक होते. म्हणून त्यांनी शतकानुशतकांच्या मानसिक गुलामीत अडकलेल्या देशाला जागवण्याचे काम सुरू केले. जन्मभर त्यांनी ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन म्हटले आणि रामराज्याची कल्पना केली; पण प्रत्येक धर्माचा सन्मान बाळगला. सर्वावर प्रेम केले, म्हणून ते बॅरिस्टरचे महात्मा गांधी झाले. पूज्य बापू झाले. संपूर्ण जगात सत्य, अहिंसा आणि शांतीचे दूत झाले.

समाजामध्ये कोणत्याही कारणाने फूट पडू लागली तर सगळ्या देशाला त्याची झळ पोहोचते, हे आपण विसरता कामा नये. दुर्दैवाने जाती आणि धर्माचे राजकारण आजही आपल्याकडे चालते, ध्रुवीकरणाची भयंकर षडयंत्र रचली जातात! ते मणिपूर असेल, वा हरयाणा अशा घटना चिंता उत्पन्न करतात. या मातीतला प्रत्येक बाळगोपाळ हिंदुस्तानी आहे… मग हिंसा कशासाठी? वैमनस्य कशासाठी? हा देश राम-रहीम संस्कृतीचा देश आहे. धर्माच्या नावावर फाळणी हा अत्यंत घृणास्पद आणि महागात पडेल, असा खेळ आहे. सगळे विष आणि वैमनस्य बाजूला सारून, स्वातंत्र्याच्या उत्सवात एकजुटीने सहभागी होताना ‘हिंदुस्तान जिंदाबाद’ हाच आपला नारा असला पाहिजे!


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button