ताज्या बातम्या

तीन हजार कार घेऊन जाणारे जहाज उत्तर समुद्रात पेटले; एकाचा मृत्यू


दहेग (नेदरलॅंड) : तब्बल तीन हजार कार घेऊन जाणाऱ्या एका मालवाहू जहाजाला नेदरलॅंडजवळ उत्तर समुद्रामध्ये आग लागली आहे. या आगीमध्ये जहाजावरील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे आणि इतर काही जण जखमी झाले आहेत  या जहाजावरील आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे नेदरलॅंडच्या तटरक्षक दलाने सांगितले आहे.



या जहाजाला लागलेली आग विझविण्यात अपयश आल्यानंतर आता जहाजावरील 23 कर्मचाऱ्यांना सोडवण्यासाठी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. सध्या या जहाजाच्या आजूबाजूला अनेक लहान बोटी आहेत आणि परिस्थितीवर देखरेख केली जाते आहे, असे तटरक्षक दलाच्या प्रवक्‍त्या लिया वर्स्टेग यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

या जहाजावरील कर्मचाऱ्यांना सोडवण्यामध्ये खराब हवामान आणि जहाजाचे आतापर्यंत झालेले नुकसान याचे मोठे आव्हान आहे. हे जहाज बुडण्याची शक्‍यता लक्षात घेऊनच बचाव कार्य सुरू आहे, असे त्या म्हणाल्या.

हे जहाज सध्या जर्मनीचे बंदर ब्रेमेनपासून इजिप्तचे बंदर सैददरम्यानच्या समुद्रात आहे. जहाजाला आग लागण्यामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या जहाजावर 2,857 इलेक्‍ट्रिक कार असून, यामुळे आग विझविणे अधिकच अवघड होऊन बसले आहे. या जहाजाबद्दल जर्मन प्रशासनालाही सतर्क करण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
  • .
Back to top button