संवेदनशील मुख्यमंत्री, सहा किलोमीटर ची पायपीट करून मदतकार्य
पनवेल: रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुक्यात इरसालवाडी येथे बुधवारी मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेनंतर तातडीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी सात वाजता इरसालवाडीच्या पायथ्याशी असणाऱ्या वाडीत पोहचले. त्यानंतर दुपारपर्यंत ते खालापूर पोलीस ठाण्यातून संपुर्ण घटनेसाठी होत असलेल्या मदतकार्याचा आढावा घेत होते. खुद्द मुख्यमंत्रीच आपत्ती व्यवस्थापनासाठी ठाण मांडून बसल्याने सर्वच सरकारी यंत्रणा कामाला लागल्या. अखेर दुपारी पाऊस धुके आणि निसरडा रस्ता अशी आव्हाने असतानाही मुख्यमंत्री इरसालवाडीच्या घटनास्थळापर्यंत पोहचले. मुख्यमंत्र्यांच्याच या संवेदनशीलतेबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. परंतू नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाला लागणारे आधुनिक तंत्रज्ञांचा अभाव तसेच प्रत्येक आदिवासी वाडीपर्यंत वाहने जाण्यासाठीचा रस्ता यासारख्या अडचणींविषयी सरकार गंभीर असणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रीया विविध स्तरातून उमटत आहेत.
रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व सरकारी विभागाच्या अधिकाऱ्यांना मध्यरात्रीनंतर इरसालवाडीची घटना समजली. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या घटनास्थळी पहिल्यांदा धाव घेतली. रात्रीच्या काळोखात मोबाइलच्या बॅटरी तसेच मोठ्या बॅटरीच्या प्रकाशात इरसाल वाडीची वाट अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी धरली. जुन्या मुंबई पूणे महामार्गालगतच्या चौक फाट्यापासून इरसालवाडीकडे पायी जाण्यासाठी आदिवासी बांधवांना तीन तास लागतात. सामान्य व्यक्तींना यासाठी पाचहून अधिक तास लागणार होते. परंतू तीन दिवसांच्या मूसळधारांमुळे येथे वाट निसरडी झाली होती. याच निसरड्या वाटेवरुन इरसाल वाडीपर्यंत पोहचणे हेच मोठे आव्हान पन्नासीपार झालेल्या सरकारी अधिकाऱ्यांसमोर होते. एनडीआरएफच्या जवानांनी पहाटेपासून इरसाल वाडीवर पोहचण्यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तूम्ही तूमच्या जबाबदारीवर वर येण्याचे आवाहन केले होते. अनेक सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची या डोंगर चढाईतच दमछाक झाली. एनडीआरएफ जवनांनी सकाळपासून मातीच्या ढीगाऱ्याचा उपसा करण्यापूर्वी इमर्जन्सी अलर्ट यंत्रणा कार्यान्वित करुन येथे ढिगाऱ्याखाली माणसांचा शोध सूरु केला होता.
खराब हवामानामुळे येथे हॅलिकॉप्टरने मदत देणे अशक्य होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मदतीचा आढावा हॅलिकॉप्टरने घेता आला नाही. दुपारपर्यंत मुख्यमंत्री शिंदे हे खालापूर पोलीस ठाण्यात बसून जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिका-यांकडून आढावा घेतला. मुख्यमंत्री दुपारनंतर रेनकोट व बूट घालून भर पावसात इर्शाळवाडीकडे जाण्यासाठी निघाले. दुर्घटनेत अनेक नातेवाईक आपल्या बेपत्ता नातेवाईकांसाठी हुंदके देत इर्शाळवाडीवर असताना त्यांची भेट घेऊन त्यांना धीर देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले. पनवेल, खालापूर उरण येथील आदिवासीवाड्यांवर स्वतंत्रपूर्व काळापासून रस्ता नाही. हा रस्ता सरकारने बांधावा असे अनेक प्रस्ताव वन विभागा आणि प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात पडून आहेत. इर्शाळवाडीची अवस्था अशीच आहे. राज्यभरातील अनेक गिर्यारोहकांनी इर्शाळगडावर चढाई केली आहे. त्यामुळे हा रस्ता अनेकांना माहित आहे. भूस्खलन होण्याच्या शक्यतांच्या यादीत इर्शाळवाडीचा समावेश नव्हता. मात्र या घटनेमुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला पुन्हा अभ्यास करुन अशा वाड्यांपर्यंत जावे लागणार आहे