जगातला सर्वात महागडा आंबा? शेतकऱ्याने ठेवला पहारेकरी, लावले सीसीटीव्ही
आंबा हे विशेषतः उन्हाळी फळ असलं तरी त्याचं नाव ऐकताच पावसाळ्यात आणि हिवाळ्यातसुद्धा तोंडाला पाणी सुटतं. त्यामुळे आंबे उत्पादनातून व्यापाऱ्यांना हजारोंचा नफा मिळवता येतो.अशातच बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने एक अनोखी शक्कल लढवली आहे. आधीच महाग असलेल्या आंब्यांमध्ये या शेतकऱ्याने जगातला सर्वात महागडा आंबा बाजारात आणलाय. विशेष म्हणजे या आंब्याच्या बागेत त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत, पहारेदारी करायला एक कुत्राही ठेवलाय. एवढं काय आहे या आंब्यात पाहूया.
कोणी नेले एक-दोन आंबे तर काय होतंय? असा विचार तुम्ही करत असाल, तर जरा थांबा. हिरवी कैरी किंवा सोनेरी पिवळसर अशा नेहमीच्या आंब्यांसारखा हा आंबा नाहीये. तर या आंब्याचा रंग चक्क लालसर असतो, पिकलेल्या पेरूच्या आत जो लाल रंग असतो अगदी तसाच.
या आंब्याला ‘मियाझाकी’ म्हटलं जातं. तो दिसायलाही जरा वेगळाच दिसतो, साधारणत: डायनॉसॉरच्या अंड्यासारखा. राजस्थानच्या ढकनिया गावचे रहिवासी शेतकरी सुरेंद्र सिंह यांची ही यशोगाथा. त्यांनी कोणत्या आंब्याच्या उत्पादनातून सर्वाधिक नफा होईल, याबाबत गुगलवर शोध घेतला.
त्यांना मियाझाकी आंब्याबाबत माहिती मिळाली. मग काय, 2021 साली त्यांनी थेट जपानहून या आंब्याचे रोप मागवले. पाहता पाहता रोपांना फळं येऊ लागलं. मियाझाकीची बाग पहिल्याच वर्षी 21 आंब्यांनी बहरली.
त्यांच्या वडिलांची इच्छा होती की, जेव्हा त्यांच्या बागेत कोणी येईल, तेव्हा त्यांना बाग विविध रंगांनी सजलेली दिसायला हवी. वडिलांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सुरेंद्र सिंह यांनी जवळपास तीन एकरात मियाझाकी, ब्लॅक स्टोन, सीड लेस, इत्यादी आंब्यांसह विविध मसाल्यांची लागवड केली आहे. शेतकरी मुकेश आणि राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात मियाझाकी आंब्याची किंमत किलोमागे 10 हजार रुपये आहे.
तर, आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत त्याला दोन लाख रुपये प्रतिकिलोने मागणी असते. परदेशात त्याला ‘एग्स ऑफ सनशाइन’ आणि ‘ताइयो-नो-टोमागो’ या नावांनी ओळखलं जातं. जापानमधील एका शहराच्या नावावरून त्याला मियाझाकी असं नाव पाडलं. जपान, थायलंड, फिलिपिन्स आणि भारतात त्याचं उत्पादन घेतलं जातं. साधारण 350 ग्रॅम वजनाच्या या एका आंब्यात भरपूर प्रमाणात पोषक तत्त्व असतात. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान त्याचं उत्पादन घेता येतं. त्याला परिपक्व होण्यासाठी कडक ऊन आणि मुसळधार पावसाची आवश्यकता असते.