ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांनो, इकडं लक्ष द्या! पेरणीसंदर्भात कृषी विभागाचे महत्वाचे आवाहन


नाशिक:मान्सूनच्या पावसाने ओढ दिली असून शेतकरी चिंतेत आहे. आज येईल, उद्या येईल म्हणत पावसाची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली आहे.
त्यामुळे पेरणी करावी की नाही असा पेचप्रसंग शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. अशातच नाशिक (Nashik) कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी (Agri Department) महत्वाचे आवाहन केले आहे. त्यानुसार साधारण पुढील काही दिवसांत पावसाचे आगमन झाल्यावरच पेरणीला सुरवात करावी अशी आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात अद्यापही मान्सूनचं (Monsoon In Maharashtra) आगमन न झाल्याने पिकांची काम रखडले आहे. सोबतच राज्यातील अनेक भागात अजुनही उष्णतेची लाट बघायला मिळत आहे. धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनण्याची भीती आहे. मान्सूनचा प्रवास पुढे सरकत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडत चालली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात पेरण्या खोळंबल्या असून नाशिक जिल्ह्यातही शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरण्यासंदर्भात आवाहन केले आहे.

नाशिक जिल्हा (Nashik District) कृषी विभागानुसार साधारण 15 जून ते 30 दरम्यान मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दरम्यान पाऊस झाल्यानंतर खरीप पिकांची पेरणी करावी. त्याचबरोबर पेरणी योग्य पावसाचा कालावधी हा 1 ते 7 जुलै असून या दरम्यान देखील सर्व खरीप पिकांची पेरणी करावी. 08 जुलै ते 15 जुलै दरम्यान पेरणी योग्य पाऊस झाल्यास सोप्याबी, मका, सं. ज्वारी, सं. बाजरी, कापूस, तूर, तीळ, सूर्यफूल, भात आदी पिकांची पेरणी करावी. तर या काळात भुईमूंग, मूग, उडीद ही पिके घेऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पेरणीयोग्य पाऊस झाल्यास….

त्यांनतर 16 ते 31 जुलै दरम्यान पाऊस झाल्यास सोयाबीन, मका, बाजरी, तूर, भात आदी पिकांची पेरणी करावी. कापूस, सं. ज्वारी, भुईमूग आदी पिके घेऊ नयेत. 1 ऑगस्ट ते 15 आगस्ट दरम्यान सं. बाजरी, रागी, सूर्यफूल, तूर आणि भाताच्या हळवा जातीच्या बियाणांची पेरणी करावी. तर या कालावधीत कापूस, सं. ज्वारी, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांची पेरणी करू नये, असे पत्रकात म्हटलं आहे. तर उशिरा पाऊस झाल्यास जमिनीत पुरेसा ओलावा असल्यांनंतरच पेरणी करावी. आंतरपीक पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करावा. साधारणतः 20 ते 25 टक्के अधिक बियाणांचा वापर करावा. रासायनिक खतांच्या वापरात किमान 25 टक्के कपात करावी. त्यांनतर मूग, उडीद पिकांची पेरणी शक्यतो नापेर क्षेत्रावर करावी, या पिकाखालील क्षेत्र कमी करणे अशा सूचना कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत.

कृषी विभागाचे आवाहन

तसेच सोयाबीन पिकांची पेरणी 25 जुलै पर्यंतच करावी. सोबतच पेरणीसाठी उगवण क्षमता तपासून घरचे बियाणे वापरावे. सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घ्यावे. उशिरा पेरणीसाठी ज्वारीमध्ये बियाणांचा दर 30 टक्क्यांनी वाढवावा. त्याचबरोबर खोडमाशीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्या. उपलब्ध पर्जन्याचा उपयोग करुन घेण्यासाठी मूलस्थानी जलसंधारण उपाययोजना उताराला आडवी मशागत व पेरणी, रुंद सरी वरंबा पध्दतीचा वापर इत्यादी उपाययोजना कराव्या. पावसाचा खंड कालावधी लक्षात घेऊन संरक्षित सिंचनाचा वापर करावा. जमिनीत ओलावा राहण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. तृणधान्य पिकांवर 2 टक्के युरिया तसेच कापूस व कडधान्य पीकावर 2 टक्के DAP ची फवारणी करावी, अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत.

उत्तर महाराष्ट्रात काय स्थिती ?

पावसाअभावी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात खरिपाची पेरणी रखडली आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जळगाव जिल्ह्यात ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्यांची बागायती कपाशीची पेरणी सुरू आहे. धुळे आणि नंदुरबारमध्येही चांगल्या पावसाअभावी पेरण्या लांबल्या आहेत. राज्यात कडधान्य मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. त्यामुळे अपेक्षित पाऊस न झाल्यास पेरण्यांना उशिरा होतील आणि त्यात पाऊस कमी झाल्यास त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची भीती आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button