ताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखीचं पुण्यातून भक्तीमय वातावरणात प्रस्थान.


पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या दोन्ही पालख्या पुण्यातून सासवडकडे जाण्यास मार्गस्थ झाल्या आहेत.भक्तिमय वातावरणात पुणेकरांनी पालखीला निरोप दिला.निवडुंगा विठोबा मंदिर परिसर विठू नामाचा गजराने दुमदुमला गेला होता.
दोन दिवसांच्या मुक्कामामध्ये पुणेकरांकडून मिळालेला स्नेह आणि आदरातिथ्याचा भाव मनामध्ये ठेवून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यानी आज पंढरपुराकडे प्रस्थान करताना हडपसरपर्यंत दोन्ही पालख्यांचा एकत्रित प्रवास केला असून सकाळचा विसावा झाल्यानंतर पालख्यांचे स्वतंत्रपणे मार्गक्रमण होणार आहे.हडपसर येथे प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार डॉ . अमोल कोल्हे यांनी दोन्ही पालख्यांचे दर्शन घेतले .

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी हडपसरपासून उजवीकडे वळून दिवे घाटातून सोपानदेवांच्या सासवडकडे रवाना होणार आहे. तर, संत तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर रस्त्याने सरळ जाणार असून लोणीकाळभोर येथे मुक्कामी जाईल.

आळंदीहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि देहूहून जगद्‌गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या सोमवारी रात्री उशीरा पुणे मुक्कामी आल्या होत्या .त्यामुळे पुणेकरांनी दर्शनासाठी गर्दी केली. संपूर्ण दिवसभर या वैष्णव्यांच्या मेळ्याने पुण्यातील वातावरण वारीमय झाले होते. पालखीच्या दर्शनासाठी लागलेली पुणेकरांची रीघ, शहरातील मंदिरांना वारकऱ्यांनी दिलेली भेट, टाळ-मृदंगांसह विठुनामाचा जयघोष, आपापल्या परीने प्रत्येकाने केलेली वारकऱ्यांची सेवा असे भक्तीमय वातावरण मंगळवारी शहरात दिसत होते.शहरात सकाळी मंदिरांमध्ये, दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांचा मेळा जमला आणि भारूड, भजन, हरिपाठ, अभंग, ओव्या अशी भक्तीमय सकाळ शहरात उजाडली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असलेल्या पालखी विठोबा मंदिर आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असलेल्या निवडुंग्या विठोबा मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच रीघ लावली होती.पादुकांच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहून प्रतीक्षा करत असलेल्या भाविकांनी हरिनामाचा गजर करत, टाळ-मृदंगांवर ताल धरला आणि शीण घालवला. या वारकऱ्यांची बडदास्त ठेवण्यासाठी अनेक संस्था, संघटना, परिवार सरसावले होते. नाश्‍ता, चहा, जेवण या सगळ्यांची लगबग दिंडी आणि पालखी मुक्कामाच्या ठिकाणी दिसून आली. शिवाय गणेश मंडळांकडून वारकऱ्यांना चौकाचौकात चहा आणि अल्पोपहार देण्यात आला. तसेच वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीची व्यवस्था महापालिकेशिवाय काही स्वयंसेवी संस्थांनीही केली होती. त्यामध्ये रक्तशर्करा तपासणी, नेत्र तपासणी यांचा समावेश होता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button