तांदूळ उत्पादन वृद्धीसाठी रायगडचे एसआरटी सातासमुद्रापार
तांदूळ उत्पादकता वाढवण्याकरिता रायगड जिलह्यातील कर्जत येथील सगुणाबाग निसर्ग प्रकल्पाचे निर्माते आणि ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ शेखर भडसावळे यांनी संशोधीत केलेले सगुणा राईस टेक्निक (एसआरटी) राज्यातील शेकडो शेतकऱ्यांनी स्वीकारले असून, उत्पादन खर्च कमी होऊन तांदूळ उत्पादन दुप्पट झाल्याचा अनुभव या सर्व शेतकऱ्यांचा आहे..
या एसआरटी तंत्राला युनायटेड नेशन्सच्या फूड अॅन्ड अॅग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनने मान्यता दिली असल्याने आता हे तत्र जगभारातील विविध देशातील शेतकऱ्यांकरिता उपलब्ध होणार आहे. जगातील तांदूळ उत्पादकता वृद्धीला गती प्राप्त होऊन एक क्रांतिकारी बदल कृषी क्षेत्रात जागतिक पातळीवर घडून येणार असल्याची विश्वास ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ शेखर भडसावळे
यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केला आहे.
दरम्यान नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जत येथे सगुणा बाग येथे या एसआरटी कृषी तंत्राची संपूर्ण माहिती घेतल्यावर राज्य सरकारकडून ते स्वीकृत करून, राज्याच्या कृषी विभागाने हे तंत्रज्ञान राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिल्याने आता या तंत्रज्ञानास महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळाला आहे. मुळात जमीन सशक्त असेल तर त्यांतून निर्माण होणारे कोणतेही धान्य हे सशक्त असते आणि हे सशक्त धान्य सेवन केल्याने मानव सशक्त बनेल असे सूत्र या एसआरटी पद्धतीच्या मागे आहे. जमिनीतील नैसर्गिक पोषक द्रव्ये कमी झाल्याने शेती उत्पादनात घट होऊन शेती तोट्याची होऊ लागली. यावर मात करण्याकरिता एसआरटी शेती पद्धती विकसित केली असून ती यशस्वी होत असल्याचे भडसावळे यांनी सांगितले.
एसआरटी तंत्रज्ञान म्हणजे काय ?
भात पिकासाठी एसआरटी तंत्रज्ञान विकसित केले. बदलत्या हवामानाला जुळवून घेण्याची ही शेतीपद्धती आहे. दरवर्षी नांगरणी न करणे, जमिनीची धूप थांबविणे, गादीवाफ्यामध्येच सेंद्रिय घटक कुजवून गांडूळ निर्मितीस चालना देणे, तणनाशकाचा योग्य वापर, खत, बियाणे बचत आणि स्थिरीकरणाद्वारे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवून उत्पादन खर्च कमी करणे हे या तंत्राची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
एसआरटी तंत्रज्ञान पद्धती
गादीवाफे तयार करण्यासाठी सुरुवातीला एकदाच नांगरणी. त्यानंतर एकदा रोटाव्हेटरने ढेकळे फोडणे
त्यानंतर साडे चार फूट रुंद आणि अर्धा फूट उंच आणि १०० सेंटीमीटर माथा असलेल्या गादीवाफ्याची निर्मिती
गादीवाफ्यावर शेणखत आणि माती परिक्षणानुसार रासायनिक खताची मात्रा मिसळून देणे
चांगला पाऊस झाला की, गादीवाफ्यावर टोकण पद्धतीने लागवड
तंत्र वापरामुळे वाचणारा खर्च
एकदा तयार केलेला गादीवाफा कायमस्वरूपी रहातो.
गादीवाफा निर्मितीवेळी एकदाच शेणखताचा वापर
दरवर्षी नांगरणीची गरज नाही.
गादीवाफा किमान १५ ते २० वर्षे कायम रहातो. • बैलजोडीने अंतर मशागतीची गरज नाही.