जवळ्यात फुलली सफरचंदाची बाग! आढाव दाम्पत्याचा अनोखा प्रयोग यशस्वी
जवळा(अहमदनगर) : येथील शेतकर्याने सफरचंदाची बाग फुलवली असून, त्याला चांगले सफरचंदही लागले आहेत. यामधून त्यांना चांगले उत्पन्न मिळणार असून, त्यांचा अनोखा प्रयोग यशस्वी झाला आहे.
सफरचंद मानवी शरीरासाठी आहारशास्त्रानुसार अमृत मानले जाते. त्यामुळे सफरचंदाच्या फळांना देशात देशांतर्गत बाजार पेठेत चांगली मागणी असते. त्यामुळे सफरचंदाचे बाजार भाव चांगले असतात. आपण आत्तापर्यंत सफरचंद देशात फक्त काश्मीरला पिकतात किंवा मिळतात हे ऐकले.
परंतु, एखादी गोष्ट करायची ठरवली आणि तिचा सतत ध्यास घेतला. त्या दृष्टीने पावले उचलली की, यश हमखास मिळते. मग ते क्षेत्र कोणतेही असो, असेच एक व्यासंगी शेतकरी म्हणून अनिल गबाजी आढाव यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना लहानपणापासून शेतीची आवड. शेतात काम करण्याची सवय, पुढे त्यांनी बी.एस्सी शिक्षण पूर्ण केले. घरची जुनी मोठी शेतीवाडी, परंतु बँकेत नोकरी लागली.
त्यांच्या पत्नी लता त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करू लागल्या; परंतु त्यांना कौटुंबिक कामे, घरकाम, मुले सांभाळताना शेतीचा लोड वाढू लागला. परिणामी शेतीकडे काहीसे दुर्लक्ष होऊ लागले. मग अनिल आढाव यांना नोकरीत मन रमेना. काही वर्षे नोकरी करून त्यांनी नोकरीला रामराम करत एक वेगळा प्रयोग करण्याची उमेद घेऊन त्यांच्या पत्नी लता यांनी जोमाने शेती लक्ष घालून सफरचंद, पेरू, सीताफळ, अंबा, विविध फळबागा लागवड करून त्यातून यशस्वी उत्पादन घेण्यास सुरुवात केली.
त्यांना साधारण बाजारपेठेत शंभर रुपये किलोने भाव मिळण्याची अपेक्षा असून, प्रती झाड 40 ते 50 किलो माल मिळण्याची खात्री त्यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली. शेतकर्यांनी सतत एकाच पिकाकडे न वळता प्रयोगशील राहून वेगवेगळी पिके घेत बाजारपेठेत मागणी व बाजारभाव असणार्या पिकांची लागवड केल्यास शेतकर्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो, असे आढाव म्हणाले. नोकरीपेक्षा शेतीतून मिळणारे समाधान खूप मनशांती देणारे असल्याचे ते सांगतात.
अशी केली लागवड..!
आढाव यांनी गेल्या तीन वर्षापूर्वी हिमाचल प्रदेशातील नर्सरीतून ‘हर्मन 99’ या जातीच्या सफरचंदाची रोपे मागवून योग्य मशागत व निगराणी ठेवत त्यांनी 16 गुंठ्यांत 175 झाडांची लागवड केली. त्यांचा हा कुकडी कालवा पट्ट्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग करत सफरचंदाचे पिक घेत उत्पन्न चालू केले. दर्जेदार सफरचंद पिकविल्याने आढाव दाम्पत्याच्या चेहर्यावर आनंद दिसत होता.