ताज्या बातम्यादेश-विदेश

साखर एवजी गुळ खाणे योग्य..


गोड पदार्थ म्हटला, की त्यासाठी साखरेचा वापर हा ओघाने आलाच. पण पुष्कळ पारंपारिक पदार्थांमध्ये साखरेऐवजी गुळाचा वापरही आपल्याकडे केला जात असतो. साखर आणि गूळ हे दोन्ही पदार्थ एखाद्या पदार्थाला गोड चव देण्याकरिता वापरले जाणारे सर्वसामान्य पर्याय आहेत. ह्या पदार्थांचे मूळ ( ऊस ) जरी एकच असले, तरी साखर आणि गूळ ह्यांचे गुणधर्म वेगळे, त्यांच्या चवी वेळ्या, रंगरूप वेगळे, आणि त्यांच्यापासून आपल्या आरोग्याला होणारे फायदे-तोटेही वेगळेच. दोन्ही पदार्थ ऊसापासून तयार होत असले, तरी ते बनविण्याची प्रक्रिया निराळी असते. तरीही बहुतेक पदार्थांमध्ये साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर, किंवा गुळाच्या ऐवजी साखरेचा वापर करता येतो. पण आजच्या फिटनेसच्या युगामध्ये केवळ पदार्थाची चवच पाहून चालत नाही, तर त्या पदार्थामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची पोषणमुल्ये पाहणेही गरजेचे होऊ लागले आहे. त्यामुळे दैनंदिन आहारामध्ये गूळ वापरला जावा किंवा साखर, हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे.

साखर आणि गूळ तयार करण्याच्या प्रक्रिया वेगवेगळ्या असल्याने त्यांचे रंग, आणि रूपही निराळे असते. साखर पांढरी शुभ्र, तर गूळ पिवळा किंवा काहीसा काळपट दिसणारा असा असतो. काकवी किती शिजविली जाते, ह्यावर गुळाचा रंग अवलंबून असतो. साखरेचे कण टणक असतात, तर गूळाचा खडा हाताने चुरता येईल असा असतो. साखर तयार करण्यासाठी अनेक रासायनिक प्रक्रिया त्यावर केल्या जात असल्याने साखरेचे पोषण मूल्य कमी होत जाते. त्याउलट गुळामध्ये मात्र लोह, फायबर आणि क्षार टिकून राहतात. आहारतज्ञांच्या मते ज्या व्यक्तींना श्वसनाशी निगडित विकार आहेत, त्यांनी आपल्या आहारामध्ये साखरेऐवजी गुळाचा समावेश करावा.

गुळाच्या सेवनाने पचनतंत्र सुधारून बध्दकोष्ठ दूर होण्यास मदत होते. तसेच शरीरामध्ये साठत असलेली घातक द्रव्ये गुळाच्या सेवनाने बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे दुपारच्या भोजनानंतर गुळाचा एक लहान तुकडा नियमित खावा. त्याउलट साखर मात्र शून्य पोषणमूल्ये असलेली आणि कॅलरीजने भरलेली असते. साखरेच्या अतिसेवनाने ब्लड शुगर लेव्हल अचानक कमी जास्त होऊ शकते. ह्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा ह्यांसारखे आजार उद्भविण्याची शक्यता वाढते.

साखरेचे अतिसेवन रोगांना आमंत्रण देणारे आहे, तर गूळ हा शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणारा आहे. त्यामुळे साखरेच्या मानाने गुळाचे सेवन आरोग्यास हितकारी असले, तरी ह्याचे ही अतिसेवन आहारामध्ये असू नये. गूळ कितीही गुणकारी असला, तरी ह्याच्या अतिसेवनाने शरीरामध्ये कॅलरीजचे प्रमाण वाढते. त्यामुळे साखर खायची असो, वा गूळ खायचा असो, ते खाल्ले जाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण असणे अधिक महत्वाचे आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button