ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी दोन समित्या, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती


पुणे: पालखी सोहळ्यातील प्रश्न सोडवण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील एक समिती पालखी सोहळा पूर्ण होईपर्यंत दर आठवड्याला नियोजन करेल. तसेच पुढील वर्षभरात करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात दुसरी समिती नियोजन करणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील पाटील यांनी दिली.

पालखी सोहळा आढावा बैठक गुरुवारी (दि.२५) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यानंतर पत्रकारांशी सवांद साधताना ते बोलत होते. आमदार दत्तात्रय भरणे, संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पोलिस आयुक्त रितेश कुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थानांच्या तसेच दिंड्यांच्या प्रमुखांनी विविध समस्याची सरबत्ती केली, हे प्रश्न सोडवण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. बैठकीत संस्थानांनी पालखी सोहळ्यादरम्यान येत असलेल्या समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. त्यात प्रामुख्याने पालखीतळाच्या जागेबाबत सर्वच संस्थानांच्या प्रमुखांनी तक्रारी केल्या, त्यावर पाटील यांनी यासंदर्भात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संस्थांचे प्रमुख तसेच प्रशासकीय अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही समिती दर आठवड्याला आढावा घेऊन पालखी सोहळ्यात येणाऱ्या समस्यांच्या संदर्भात उपायोजना करणार आहे.

पंढरपूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर टोल सुरू करण्याचे नियोजन पुढील महिन्यात अर्थात जूनमध्ये होणार आहे. याबाबत सर्व संस्थान प्रमुखांनी हा टोल जूनऐवजी जुलैमध्ये सुरू करावा, अशी आग्रही मागणी केली. त्यावर एनएचएआय प्रकल्प व्यवस्थापकांनी सांगितले, यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केल्यास हा टोल जुलैमध्ये सुरू करता येईल. मात्र, पाटील यांनी तातडीने यावर हस्तक्षेप करत हा टोल जूनमध्ये सुरू झाला, तरी वारकऱ्यांच्या सर्व वाहनांना मोफत पास देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश प्रकल्प संचालकांना दिले. तसेच आज नितीन गडकरी पुण्यातच आहेत. हा विषय त्यांच्याशी बोलून मार्गी लावू, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

देहू संस्थांचे विश्वस्त माणिक महाराज मोरे म्हणाले, देहूमध्ये सोहळा सुरू असताना वारकऱ्यांना थांबण्याची सोय नाही. या ठिकाणी एक गायरान आहे. त्याची जागा ३५ एकरांवर पसरलेली आहे. हे गायरान पूर्ण वेळ संस्थानांच्या वारकऱ्यांसाठी आरक्षित करावे. जेणेकरून देहूत वर्षभर येणाऱ्या वारकऱ्यांची सोय होईल. याबाबत पाटील यांनी यंदाच्या वर्षात ही समस्या येणार नाही, अशी ग्वाही दिली. तसेच या गायरानावर अनेक सरकारी संस्थांसह इतर स्वयंसेवी संस्थांनीही दावा केलेला आहे. त्याबाबत पालखी सोहळ्यानंतर स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी पाटील यांनी मोरे यांना दिले.

झाडांच्या संगोपनासाठी समिती

दोन्ही पालखी मार्गावर हरित वारीचे नियोजन केले जात. रस्ता रुंदीकरणामुळे दोन्ही मार्गांवरील झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना सावलीत बसता येत नाही. यासाठी दोन्ही मार्गांच्या कडेने झाडे लावावीत आणि त्याचे संगोपन करण्यासाठी सर्वच संस्थानांच्या प्रमुखांची तसेच अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करून ते झाडे जगवण्यासाठीचे नियोजन करावे, अशी सूचना आळंदीच्या विश्वस्तांनी केली. त्यावर सौरभ रावांनी तत्वतः मान्यता दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button