कापूस दरावरील दबाव कधीपर्यंत राहील?
मे महिन्यात हंगामातील सर्वात कमी भाव मिळत असल्याने शेतकरी पुरते अडचणीत आले आहेत. माॅन्सूनच्या तोंडावर शेतकरी कापूस ठेवणार नाहीत, याची जाणीव असल्याने बाजारावर दबाव वाढवला गेल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे.
त्यामुळे भाव कमी असतानाही शेतकरी कापूस विकत आहेत. सध्या कापसाची बाजारातील रोजची आवक एक लाख गाठींच्या दरम्यान असल्याचे उद्योगांकडून सांगण्यात आले.
देशातील कापूस उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. चांगल्या भावाच्या अपेक्षेने कापूस मागे ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीला कापसाला सरासरी ८ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत होता.
गेल्या हंगामातही हंगामाच्या सुरुवातीला सरासरी ७ हजार रुपये भाव होता. मार्चनंतर भावात मोठी वाढ झाली होती. यंदाही असचं घडेल, अशी आशा शेतकरी बाळगून होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मार्च महिन्यापर्यंत कापूस रोखला. पण मार्चपासून बाजारातील आवक वाढत गेली.
याचा दबाव बाजारावर आला. मार्च आणि एप्रिल महिन्यात सरासरी ८ हजार रुपये भाव मिळत होता. पण मे महिन्यात कापूस दरात घट होत गेली.
कापसाला सध्या सरासरी ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. हा भाव चालू हंगामातील निचांकी आहे. शेतकऱ्यांनी तीन ते चार महिने कापूस मागे ठेऊनही हंगामातील निचांकी भाव मिळत आहे.
मागील पंधरा दिवसांमध्येच कापसाचे भाव १५ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत. खरिप लागडीच्या तोंडावर बहुतांशी शेतकरी कापूस विकतील, याचा अंदाज उद्योगांना होता. सध्या तसचं घडत आहे. कापसाचे भाव घसरले असतानाही शेतकरी कापसाची विक्री वाढवत आहेत.
दरवर्षी मे महिन्यात बाजारात रोज सरासरी २० हजार गाठी कापसाची आवक होत असते. एक गाठीमध्ये १७० किलो रुई असते. पण चालू वर्षी मे महिन्यातील रोजची आवक १ लाख गाठीच्या दरम्यान होत आहे. म्हणजेच सध्याची आवक पाच पटीने अधिक आहे.
बाजारात आवक वाढल्याने उद्योगांकडून आणखी दबाव आणण्याचे काम सुरु आहे, असे बाजारातील अभ्यासक सांगत आहेत. सूतगिरण्या तोट्यात काम करत असल्याची ओरड सुरु झाली. वास्तविक पाहता देशातील मोठ्या उद्योगांचे बॅलन्सशीट फायद्यात असल्याचे दिसते. पण शेतकऱ्यांना कापूस विकल्याशिवाय पर्याय नाही, हे माहीत असल्याने दबाव वाढवला जात आहे, असेही काही जाणकारांनी सांगितले.
देशातील बाजारात सध्या कापसाला ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. ऐन मे महिन्यात हंगामातील सर्वात कमी भाव मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे व्यापारी आणि शेतकरी सांगत आहेत. तसेच शेतकऱ्यांकडे आणखी किती कापूस शिल्लक आहे यावरूही मतमतांतरं दिसतात.
काहींच्या मते शेतकऱ्यांकडे २५ लाख गाठींच्या दरम्यान कापूस शिल्लक आहे. तर काहींच्या मते ४० ते ५० लाख गाठी कापूस शिल्लक आहे. पण काॅटन असोसिएशनचा उत्पादनाचा अंदाज गृहीत धरल्यास शेतकऱ्यांकडे जास्त प्रमाणात कापूस नसेल. पण शेतकऱ्यांची सध्याची विक्री पाहता आवकेचा दबाव असेपर्यंत दरावरील दबावही कायम राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.