ताज्या बातम्या

80 एन्काऊंटर करणारे दया नायक इज बॅक, या खात्याचा स्वीकारला पदभार


मुंबई: पोलीस निरीक्षक दया नायक हे पुन्हा एकदा मुंबई पोलिसात रुजू झाले आहेत. एटीएस महाराष्ट्रमध्ये तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानतंर आता त्यांनी गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 9 मध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईत गुन्हे शाखेत पदभार स्वीकारल्यानंतर दया नायक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “प्रत्येकाच्या अपेक्षा करू आणि माझ्या क्षमतेनुसार मुंबईची सेवा करेन.” राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या गेल्या महिन्यात करण्यात आल्या होत्या. यात चकमक फेम पोलीस निरीक्षक दया नायक यांची मुंबई पोलीस दलात बदली झाली. दया नायक हे दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत होते.

2021 मध्ये एटीएसमधून त्यांची गोंदियात बदली केली होती. दया नायक यांची एंटालिया-मनसुख हिरेन प्रकरणामुळे बदली करण्यात आली होती. त्यावेळी प्रशासकीय बदली असल्याचं कारण सांगितलं गेलं होतं. तेव्हा दया नायक यांनी बदलीच्या आदेशाला मॅटमध्ये आव्हान दिलं होतं.

अखेर नायक यांच्या बदलीच्या आदेशाला मॅटने स्थिगिती दिली होती. तेव्हापासून दया नायक हे एटीएसमध्ये कार्यरत होते. एन्काउंटर स्पेशालिस्ट अशीही दया नायक यांची ओळख आहे. 1995 मध्ये दया नायक हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झाले होते.

त्यांनी गुन्हे अन्वेषण शाखेत प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलं. प्रदीप शर्मा यांच्या एन्काउंटर पथकात ते होते. 1996 मध्ये दया नायक यांनी पहिला एन्काउंटर केला. त्यांनी जवळपास 80 एन्काउंटर केले आहेत.

बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोपही दया नायक यांच्यावर झाले होते. यामुळे त्यांना 2006 मध्ये निलंबित करण्यात आलं होतं. एसीबीने त्यांना अटक केली होती. मात्र पुरावे सादर न केल्यानं दया नायक यांना क्लीन चीट मिळाली.

2012 मध्ये ते पुन्हा सेवेत रुजू झाले. तेव्हाही मुंबईहून नागपूरला बदली झाल्यानंतर ते रुजू झाले नव्हते. त्यावेळी दया नायक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. 2016 मध्ये त्यांच्यावरील कारवाई मागे घेत पुन्हा मुंबईत पोस्टिंग देण्यात आलं होतं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button