ताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकाच दिवशी पकडली १ कोटी १५ लाखांची वीजचोरी


डोबिवली: महावितरणच्या कल्याण मंडल कार्यालय दोन अंतर्गत महिला अधिकाऱ्यांच्या एका विशेष पथकाने बदलापूर पश्चिमेत एकाच दिवशी तिघांविरुद्ध धडक कारवाई करत जवळपास एक कोटी १५ लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश केला.कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी चोरीच्या विजेचा वापर करणाऱ्या कारव ग्रामपंचायतीचा समावेश आहे. याशिवाय बाटलीबंद पाणी तसेच जीन्स वाशिंग कारखान्यावर कारवाई करून मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वीजचोरी पथकाने उघडकीस आणली. उपकार्यकारी अभियंता अनिता चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २१ एप्रिलला बदलापूर पश्चिमेतील कारव परिसरात तपासणी मोहिम राबवली. यात कारव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मीटर टाळून थेट वीजचोरी सुरू असल्याचे आढळून आले.



अधिक तपासणीत ग्रामपंचायतीने सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे २७ लाख ४६ हजार रुपये किंमतीची १ लाख २४ हजार ८४० युनिट वीज चोरल्याचे निष्पन्न झाले. तर याच ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोरया ब्रेव्हरिज या बाटलीबंद पाण्याच्या कारखान्यात मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी सुरू असल्याचे आढळले. या कारखान्याने सुमारे ८६ लाख २८ हजार रुपयांची ३ लाख ९२ हजार २०६ युनिट वीजचोरी केल्याचे उघडकीस आले. तर तिसऱ्या ठिकाणी स्वप्नील शेवाळे याच्या जीन्स वाशिंग व डाईंग कारखान्यात मीटर बायपास करून थेट वीजचोरी सुरू असल्याचे आढळले.

याठिकाणी १ लाख ९८ हजार रुपये किंमतीची ९ हजार १८ युनिट विजेचा चोरटा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. या तिन्ही ग्राहकांना चोरीच्या विजेचे देयक भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली असून विहित मुदतीच्या आत देयकाचा भरणा न झाल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार असल्याचे महावितरणने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांनी या धडक कारवाईबाबत महिला अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाचे कौतूक केले. उपकार्यकारी अभियंता चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता नेहा ढोणे, जनमित्र रमेश शिंदे, प्रशिक्षणार्थी प्रथमेश जाधव, चालक सुर्यकांत यांच्या पथकाने ही कारवाई केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button