ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’चा रुग्ण!


नागपूर: गुइलेन- बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा दुर्मिळ आजार झालेली मुलगी मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी आली. ती सलग ७५ दिवस जीवनरक्षण प्रणालीवर होती परंतु डॉक्टरांच्या यशस्वी उपचाराने बरी होऊन ती मंगळवारी घरी परतली.



लक्ष्मी (बदललेले नाव) ला अकोल्याहून १४ जानेवारीच्या रात्री मेडिकलमध्ये आणले गेले. येथे येण्यापूर्वी जीबीएस या दुर्मिळ आजारामुळे तिचे दोन्ही हात व दोन्ही पायाच्या क्रिया बंद झाल्या होत्या. तिला मानही उचलता येत नव्हती. अकोल्यातील खासगी रुग्णालयातही ती सुमारे पंधरा दिवस जीवनरक्षण प्रणालीवर होती. येथे उपचाराचा खर्च करताना कुटुंबीयांना शेती व दागिने विकावे लागले.

आणखी वाचा- सावधान! रसवंतीतला बर्फ धोकादायक

शेवटी हताश होऊन त्यांनी मेडिकलला आणले. तिला जीवनरक्षण प्रणालीवर ठेवले गेले. उपचारादरम्यान खूपच गुंतागुंत निर्माण होत होती. औषधशास्त्र विभागातील सर्व निवासी डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर यांनी प्रयत्न सुरू केले. फुफ्फुसांचा एक भाग निकामी होण्याच्या मार्गावर होता. निमोनियाही झाला. रक्तदाब, हृदयाचे ठोकेही अनियंत्रित होत होते. बऱ्याचदा अतिसार झाला. परंतु डॉक्टरांनी तिला गंभीर स्थितीतून बाहेर काढले. नंतर जीवनरक्षण प्रणाली काढून प्राणवायूवर ठेवले. रोज डॉक्टर-परिचारिका आल्यावर ती त्यांना हात जोडून नमस्कार करत होती. शेवटी मंगळवारी ती घरी परतली. यावेळी मुलीसह तिच्या नातेवाईकांचेही डोळे पाणावले. या मुलीवर यशस्वी उपचारात डॉ. मिलिंद व्यवहारे, डॉ. प्रवीण शिंगाडे. डॉ. हरीश सपकाळ, डॉ. राधा ढोके, डॉ. रिया साबू, डॉ. सजल बंसल, डॉ. पूजा बोरलेपवार, डॉ. सुमित मांगले, डॉ. विशाल बोकडे, डॉ. ज्योत्स्ना आणि इतर सगळ्याच कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका वठवली.

जीबीएस म्हणजे काय?

गुइलेन- बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजारात शरीरातील मांसपेशी कमकुवत होतात. त्यामुळे अचानक रुग्णाचे हात-पाय लुळे पडतात. रुग्णाच्या श्वसन यंत्रणेवर परिणाम होत असल्याने जीवनरक्षण प्रणालीवर ठेवावे लागते. आयव्हीआयजी नावाचे औषध लागते. त्याची एक बाटली सात ते आठ हजारांची येते. या रुग्णावर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार झाले. त्यामुळे रुग्णाला खर्च आला नाही, हे विशेष.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button