ताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वत:च्या खिशातून 25 हजारांची देणगी देत शाहू महाराजांनी मराठीत आणला होता ‘कुराण’


कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला नेहमीच पुरोगामींची भूमी म्हटले जाते या भूमीने राज्याच्या पुरोगामी चळवळीला दिशा दिली आहे. या पुरोगामी चळवळीचा पाया रचण्याचे काम लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजयांनी केले होते. सर्व जाती धर्मांसाठी शाहू महाराजांनी शिक्षणाचा प्रशस्त करून दिला होता. इतक्यावर न थांबता त्यांनी मुस्लीम समाजाच्या उन्नतीसाठी कोणतीही कसर बाकी ठेवली नव्हती. या सर्व ऐतिहासिक घटनांची साक्ष दसरा चौक आजही आपल्याला देत असतो. महाराजांनी मुस्लिम समाजाचा उद्धारासाठी स्वतःहून पुढाकार घेतला होता. मराठा, जैन, लिंगायत आणि अस्पृश्य समाजाची मुली शिक्षणात मागे असल्याने त्यांनी त्या समाजातील मुलांसाठी शाळा वसतीगृहे सुरू केली. त्यामुळे त्या समाजातील मुलांचा मार्ग प्रशस्त झाला.

इतिहासकार डाॅ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या “राजर्षी शाहू छत्रपती महाराज” या पुस्तकामध्ये शाहू महाराजांनी मुस्लीम समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला आहे.

मुस्लीम वसतीगृहाची स्थापना

तत्कालिन कालखंडात मुस्लिम समाजातील मुलांचा शाळेकडे कल नव्हताच. केवळ हाताच्या बोटावर मोजणारी मुले शाळेत जात होती. त्यामुळे त्यांची सोय महाराजांनी मराठा वसतीगृहात केली होती. मात्र, मुस्लीम समाजासाठी सुद्धा वसतीगृह असावे, अशी त्यांची मनोकामना होती. मुस्लिम समाजातील लोक त्यासाठी पुढे येत नव्हते अखेर शाहू राजांनी स्वतःच काही प्रतिष्ठित मुस्लिम नागरिकांची बैठक बोलावत वसतीगृहाची संकल्पना मांडली. यावेळी इतर समाजासाठी केलेल्या वसतिगृहांचा दाखला बैठकीत दिला. तसेच मुलांची संख्या वाढेल, याकडेही लक्ष वेधले.

निधी जमवण्याची महाराजांनी केली सूचना

त्यावेळी महाराजांनी संकल्पना मांडल्यानंतर बैठकीसाठी आलेल्या मुस्लीम नागरिकांनी आम्हाला काय करता येईल? अशी विचारणा केली. तेव्हा महाराजांनी किमान 3000 रुपये तुम्ही जमा करावेत तेवढीच रक्कम मी स्वतः दरबारच्या वतीने देईन, अशी ग्वाही दिली. शाहू राजांच्या विनंतीला मान देत उपस्थितांनी जागेवरच चार हजार रुपये जमा केले. तेव्हा शाहूराजांनी तेवढीच रक्कम देण्याचे आश्वासन दिले.

मोहामेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना

बैठक पार पडल्यानंतर सर्वांनी मिळून मोहामेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. स्वत: शाहू महाराज त्या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष झाले. उपाध्यक्षपदी संस्थानच्या दिवाणांची निवड करण्यात आली आणि कार्यवाहपदावर करवीरचे मामलेदार शेख महंमद युनूस अब्दुल्ला यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे हे मामलेदार व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगचे विद्यार्थी होते. शाहू महाराजांचे गुरु सर फ्रेझर यांनी सन 1920 मध्ये कोल्हापूरला भेट दिली. तेव्हा महाराजांनी त्यांच्याच हस्ते मुस्लिम बोर्डिंगच्या इमारतीची पायाभरणी केली. त्यावेळी शाहूराजांनी साडेपाच हजार रुपयांचे रोख देणगी देत 25 हजार चौरस फूट मोकळी जागाही दिली.

महाराजांनी कुराण ग्रंथ मराठीत आणला

महाराजांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे मुस्लीम समाजातील मुलेही शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागली. शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर त्यावेळी प्रतिष्ठीत मुस्लीम समाजातील नागरिकांनी त्यांचा धर्मग्रंथ अरबी भाषेत असल्याने वाचता येत नाही, त्याचे मराठीत भाषांतर करण्याची गरज असल्याचे शाहू राजांना भेटून सांगितले. तेव्हा शाहू राजांनी स्वतः तातडीने 25000 रुपयांची देणगी देत कुराण ग्रंथ मराठीत आणला.

विवाह नोंदणी सक्तीची केली

शाहू महाराजांनी मुस्लीम समाजातील विवाहाची सरकारी नोंद सक्तीची केली होती. त्यामुळे काजीकडून विवाह झाला, तरी त्याची नोंद त्याने रजिस्टरमध्ये करून त्यावर हुजूर ऑफिसमध्ये सही व शिक्का घ्यावा असे बंधन घातले. त्यामुळे संबंधित विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. महाराजांनी स्त्रियांच्या हक्काचे रक्षणही केले.

  1. संदर्भ – राजर्षी शाहू छत्रपती महाराज लेखक – डाॅ. जयसिंगराव पवार


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button