ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा बांधवांचा निर्धार! ओबीसीतून आरक्षणासाठी तुळजापूर ते मंत्रालय ‘वनवास यात्रा’ निघणार


धाराशिव : मराठा समाजाला ५० टक्केच्या आतील आरक्षण ओबीसीमधूनच देण्यात यावे, या मागणीसाठी मराठा समाजाच्यावतीने तुळजापूर ते मंत्रालयादरम्यान ‘मराठा वनवास यात्रा’ काढली जाणार आहे.
यात्रेस ६ मे रोजी तुळजापूर येथून प्रारंभ होईल व ती ६ जून रोजी मंत्रालयावर धडकेल, अशी माहिती मराठा वनवास यात्रेचे संयोजक योगेश केदार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून दिली.



सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत संयोजक योगेश केदार म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी ६ मे रोजी तुळजापूर येथून वनवास यात्रेस सुरुवात होईल. ही यात्रा विविध गावांत मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करीत ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळादिनी मुंबई मंत्रालयावर धडकणार आहे. यंदाचा राज्याभिषेक सोहळा मराठा बांधव आझाद मैदानावरच साजरा करतील, असे सांगितले. या यात्रेत हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. जोपर्यंत मराठा समाजाचा समावेश ओबीसी आरक्षणात होत नाही, तसा अधिकृत जीआर निघत नाही, तोपर्यंत मराठा बांधव ठिय्या मांडून बसणार असल्याचे केदार म्हणाले. जास्तीत जास्त समाजबांधवांनी मराठा वनवास यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले.

पावणेपाचशे किलोमीटरचा प्रवास…
तुळजापूर ते मुंबई असे जवळपास पावणेपाचशे किलोमीटर अंतर मराठा बांधव पायी चालत जाणार आहेत. तुळजापूर ते मुंबई दरम्यान ९२ गावांमधून ही यात्रा जाणार आहे. काही गावांमध्ये मुक्काम व सभाही होणार आहेत. पहाटे पाच ते सकाळी १० व सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवास केला जाणार आहे. असे मराठा वनवास यात्रा संयोजक सुनील नागणे म्हणाले.

पवारांनी खंजीर खुपसला…
२३ मार्च १९९४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ओबीसीचे आरक्षण वाढवून ५० टक्केचा कोटा पूर्ण केला. त्यामुळे मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण गेले. शरद पवार यांनी असा निर्णय घेऊन मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप संयोजकांनी केला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button