बारावीत शिकणारी नम्रता वराहपालनातून वळतेय उद्योजकतेकडे
बारावीला असलेली नम्रता ही शिक्षण सुरू असतानाच छोटासा ‘पिगरी फार्म’ चालवते. इयत्ता दहावीमध्ये असताना ती वडिलांना शेती व वराहपालनामध्ये (Pig Farming) मदत करत असे. त्यामुळे तिला वराहपालनाची गोडी लागली.
अभ्यासामध्येही ती हुशार असून, तिला दहावीला ८७ टक्के गुण मिळाले आहेत. सध्या तरी एक छंद म्हणून ती वराहपालनाकडे पाहत असली, तरी त्यातून तिला उद्योजकतेच्या धड्यांसोबत चांगले उत्पन्नही मिळत आहे.
नम्रताकडे सध्या दोन नर, १२ माद्या आणि चार पिल्ले आहेत. दहावीच्या सुट्ट्यांमध्ये तिने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राणी (गुवाहाटी) येथील राष्ट्रीय वराह संशोधन केंद्रामध्ये वराहपालनाचे प्रशिक्षणही घेतले आहे.
या प्रशिक्षणामध्ये वराहपालन आणि त्यांच्या ‘आर्टिफिशियल इनसेमिनेशन’चे शास्त्रीय माहिती व प्रात्यक्षिके मिळाली. त्यातून तिला या व्यवसायासंदर्भात आत्मविश्वास मिळाला आहे.
व्यवस्थापनामुळे होतेय कौतुक
– वराहपालनातील खर्च कमी करण्यासाठी नम्रता हिचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या खाद्यामध्ये ती आता भाताच्या पॉलिशदरम्यान शिल्लक राहणारे पोषक घटक आणि मासळी बाजारामध्ये शिल्लक पदार्थांचा वापर वाढत आहे.
या घटकांची पचनीयता वाढविण्यासाठी काही घटक ती शिजवून मगच खाऊ घालते.
-वराहांच्या पोषकतेसाठी तिने ॲझोला निर्मिती करत असून, त्याचा खाद्यामध्ये वापर सुरू केला आहे. वाळवलेला ॲझोला आठवड्यातून एकदा ती वराहांना देते.
-वराहांच्या आरोग्य आणि जैवसुरक्षिततेसाठी प्रशिक्षणादरम्यान तिला संस्थेकडून ‘बायोसिक्युरिटी किट’ मिळाले होते. त्याचाही ती वापर करते. सोबतच स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणावर तिचा भर असतो.
अशा सातत्यपूर्ण उपाययोजनांमुळे तिच्या वराहांचे ‘आफ्रिकन स्वाइन फेव्हर’ या रोगापासून बचाव होण्यास मदत मिळाली आहे. आजूबाजूंच्या वराहफार्ममध्ये या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठी हानी झालेली असताना तिने आपली जनावरे वाचवली, यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
उत्तम उत्पन्न
सध्या चांगले उत्पादन मिळत असले तरी तिला भविष्यामध्ये वराह पुनरुत्पादन व पैदास सुविधा तयार करण्यामध्ये अधिक रस आहे. गेल्या वर्षी ती ३२ वराह पिल्ले विकली. त्यातून १.४४ लाख रुपये मिळाले.
तर दोन प्रौढ वराहांच्या विक्रीतून तिला ६० हजार रुपये मिळाले. अशा प्रकारे दोन लाख रुपये उत्पन्न मिळाल्यामुळे तिच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाली आहे. या रकमेचा वापर स्वतःच्या शिक्षणासाठी करण्याचा तिचा मानस आहे.