ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन असामान्य कर्तृत्त्व गाजवता येते; हीच रामजन्म कथेची फलश्रुती!


आज श्रीराम नवमी. प्रभू रामरायाचे जीवनचरित्र पाहिले, तर अयोध्येचा राजकुमार असूनही त्याच्या वाट्याला का कमी हालअपेष्टा आल्या? श्रीरामांचा जन्म झाला, तो श्रावणकुमाराच्या माता पित्यांच्या शापातून. एवढा मोठा पुण्यात्मा, परंतु त्याच्या जन्माच्या आधीच त्याची सावत्र आई कैकयी त्याच्यासाठी वनवास मागून घेते. रामाचा जन्म होतो. राजा दशरथाकडून आणि कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी यांच्याकडून कोडकौतुक करून घेण्याच्या दिवसात गुरुगृही जाण्याचा प्रसंग येतो.

राजवाड्यात जन्म घेऊनही गुरुंच्या आश्रमात जाऊन पाणी भरणे, लाकडे वेचणे, गुरे राखणे ही कामे त्याला करावी लागतात. शिक्षण करून राम आणि त्याचे भाऊ घरी परततात, तर विश्वामित्र ऋषी पंधरा वर्षाच्या रामाला उपद्रवी राक्षसांचा बंदोबस्त लावण्यासाठी सोबत घेऊन जातात. परत येतात, ते मिथिला नरेशची सुपूत्री जानकी हिच्याशी विवाह करूनच!

राजा दशरथ आणि सर्व जनतेचा प्रिय सुकुमार राम, सिंहासनावर बसण्यासाठी नियुक्त केला जातो, तेव्हा कैकयी आपल्या वचनांची आठवण करून देत भरताला राजसिंहासन आणि रामाला वनवास मागून घेते. आयुष्यातला सोनेरी क्षण हातात येता येता निसटून गेला, तरी राम स्थितप्रज्ञ राहतात आणि वडिलांनी भावनेच्या भरात तिसऱ्याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी ऐन तारुण्याची चौदा वर्षे वनवासात काढतात. सावलीसारखी असलेली पत्नी सीता राजवैभव सोडून पतीच्या पाठोपाठ वनवास स्वीकारते आणि बंधू लक्ष्मणदेखील नवे नवे लग्न झालेले असतानाही पत्नीवियोग सहन करून सेवेसाठी रामापाठोपाठ जातो.

दंडकारण्यात रामाचा सामना एकापेक्षा एक भयाण राक्षसांशी होतो. राम त्यांचा पराभव करतो. ऋषी,मुनी,तपस्वी,साधू, उपेक्षित जनता, त्यांच्या भेटीसाठी आसुसलेले भक्त यांचा उद्धार करतो. अशातच रावण नामक दुष्ट राक्षस रामाच्या अपरोक्ष त्याच्या पत्नीला पळवून नेतो. जीवापाड प्रेम असलेली अर्धांगिनी तिचे आपण रक्षण करू शकलो नाही, हे शल्य त्याच्या मनाला टोचत राहते. तिच्या शोधार्थ राम आकाशपाताळ एक करतो. दशानन रावणाशी युद्ध करतो. राजधर्माला अनुसरून सीतेची अग्निपरीक्षा घेऊन सन्मानाने परत आणता़े

वनवास संपवून आल्यावर अयोध्येचा राजा बनतो. परंतु एका नागरिकाने उपस्थित केलेल्या शंकेमुळे राम पुनश्च राजधर्म आणि पतिधर्म या द्वंद्वात अडकतात. त्यांची व्यथा सीतेला कळते. तेव्हा सीतामाई आपणहून वनात जाऊन वाल्मीकी ऋषींच्या आश्रमात राहणे पसंत करते. अनेक वर्षे ती परत येत नाही. हतबल रामाला एक राजा म्हणून सीतेचा वियोग सहन करावा लागतो. परंतु सीतेवरील प्रेमापोटी तो दुसरा विवाह करत नाही. तर राजसूयज्ञाच्या वेळेस सीतेची सुवर्णमूर्ती स्थापित करतो. त्या प्रसंगी लव कुशाची भेट होते, पण ही आपलीच मुले आहेत, यापासून राम अनभिज्ञ असतो. त्यांच्यायोगे राम सीतेची भेट घेण्यास वनात जातो, तेव्हा सीता मुलांना रामाच्या स्वाधीन करून वसुंधरेच्या कुशीत कायमची निघून जाते.

रामाला संसारसुख मिळत नाहीच, शिवाय एकल पालकत्व अंगिकारून मुलांचा आणि रयतेचा सांभाळ करावा लागतो. कालपरत्वे सर्व जबाबदाऱ्या संपवून राम शरयू नदीत आपले अवतारकार्य संपवतो.

अशी ही रामकथा म्हणावी की रामव्यथा? परंतु, एवढे सगळे घडूनही रामाने पदोपदी आलेल्या परिस्थितीचा सामना केला आणि धीराने, संयमाने, न्यायाने, प्रेमाने वागून रामराज्य निर्माण केले. आपणही रामाकडून प्रेरणा घेत आपल्या आयुष्यात राम आणुया आणि प्राप्त परिस्थितीचा आनंदाने सामना करायला शिकुया. जय श्रीराम!


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button