पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तीन हजार कर्मचारी संपावर; कामकाज ठप्प
पिपरी : (आशोक कुंभार )जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सुमारे तीन हजार १५२ कर्मचारी संपावर गेले आहेत.
त्यामुळे महापालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. अतिरिक्त आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वत:च्या वाहनाने महापालिकेत यावे लागले.
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत झिंजुर्डे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचारी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एकत्र जमले आहेत. एकच मिशन जुनी पेन्शन, अशा टोप्या कर्मचाऱ्यांनी परिधान केल्या आहेत. तीन हजार १५२ कर्मचारी संपावर गेले आहेत. वाहनचालकदेखील संपात सहभागी झाले. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना खासगी वाहनाने महापालिकेत यावे लागले. महापालिकेचे संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे.
जुनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप
महापालिकेतील वर्ग एक ते वर्ग चारमध्ये सात हजारपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, २००५ नंतर महापालिका सेवेत तीन हजार १५२ कर्मचारी रुजू झाले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. प्रदीर्घ काळ कंत्राटी काम करणाऱ्या कामगारांना समान वेतन देऊन सेवेत नियमित करावे. महापालिकेतील रिक्त पदे भरावीत. अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या तसेच करोना काळात निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना वयात सूट देऊन सेवेत सामावून घ्यावे. केंद्र सरकारच्या धर्तीवर विविध भत्ते लागू करावेत. चतुर्थश्रेणीतील पदे निरस्त करू नयेत. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न तात्काळ सोडवावेत. सेवानिवृत्तीचे वय ६० करावे. आरोग्य विभागातील नर्स व कर्मचाऱ्यांचे आर्थिक व सेवा नियमांच्या समस्यांचे निराकरण करावे, यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेले आहेत.