पाण्याच्या बादलीत पडून चिमुरड्याचा मृत्यू

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पिपरी : घरात खेळत असताना पाण्याच्या बादलीत पडून एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. समतानगर कॉलनी, थेरगाव येथे गुरुवारी (दि. २) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मोहम्मद फैजल तारीक खान, असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.
वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे उत्तर प्रदेशातील तारीक खान (वय २९) आणि जोहरुबी खान (वय २५) हे दाम्पत्य त्यांच्या दोन मुलांसह समतानगर कॉलनी येथे भाडेतत्त्वारील एका खोलीत वास्तव्यास आहेत. तारीक खान हे काचेचे काम करतात. तर त्यांची पत्नी जोहरुबी गृहिणी आहेत. तारीक आणि जोहरुबी हे दोघेही मोहम्मद फैज (वय ३) आणि मोहम्मद फैजल या दोन्ही मुलांसह गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास घरात झोपले होते.

त्यावेळी एक वर्षांचा फैजल हा झोपेतून उठून रांगत मोरीमध्ये गेला. तेथे प्लास्टिकच्या २० लिटरच्या बादलीमध्ये पाणी होते. खेळत असताना फैजल बादलीत पडला. दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्याची आई जोहरुबी उठल्या असता फैजल हा बादलीतील पाण्यात पडला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर फैजल याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.