माणुसकीला काळीमा फासणारी घटना; खडकीमध्ये अवघ्या तीन वर्षाच्या मुलीचा खून

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


खडकी :खडकी येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खडकी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेची ओळख पटलेली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

खडकी रेल्वे स्थानक ते खडकीबाजारकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दक्षिणेकडील सीएएफव्हीडी मैदानाजवळ चिकूच्या झाडाजवळ मुलीचा मृतदेह आढळला. या चिमूरडीची हत्या केली असून पुरावे नष्ट करण्यासाठी अज्ञात इसमाने तिला फेकून दिले आहे.

गुन्हेगाराच्या शोधासाठी खडकी पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखेची पथके एकत्र आली आहेत. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, खडकी पोलिसांना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता पोलिस नियंत्रण कक्षाने माहिती दिली. घटनास्थळी आल्यानंतर मुलीचा गळा आवळून खून झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. गुन्हेगार अजूनही फरार आहे.

या भयावह घटनेमुळे शहरातील मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे निर्देश दिले आहेत. हत्येमागचा हेतू अद्याप अस्पष्ट असला तरी, पोलिसांनी पीडितेची ओळख पटवण्यासाठी मदत करण्यासाठी कोणाला माहिती असेल त्यांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

या गुन्ह्याचा तपास खडकी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील करीत आहेत.