जानाईदेवीची पालखी साताऱ्याकडे मार्गस्थ..
पुणे : (आशोक कुंभार )जेजुरीचे ग्रामदैवत जानाईदेवीचा पालखी सोहळा बुधवारी (ता.२२) सायंकाळी वाल्हे (ता.पुरंदर) येथील कामठवाडी मुक्कामी विसावला. रांगोळीच्या पायघड्या व फटाक्यांच्या आतषबाजीत ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
यामुळे टाळमृदंगाच्या गजराने कामठवाडी भक्तीमय झाली होती. वाल्हेकरांचा निरोप घेऊन गुरुवार (ता. २३) पहाटे नीरा नदीवरील दत्तघाटावर जानाईदेवीच्या मूर्तींना स्नान घालण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळा सातारा जिल्ह्याकडे मार्गस्थ झाला.
पाटण तालुक्यातील निवकणे येथे सालाबादप्रमाणे यात्रोत्सव व सह्याद्रीच्या निसर्गाची पूजा करण्यासाठी जेजुरी येथून जानाईदेवीची पालखी जाते. भक्तिमय वातावरणात विठू नामाचा जयघोष करत पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी पालखीचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. पालखी मार्गावर ग्रामस्थांनी रांगोळीच्या पायघड्या अंथरूण फटाक्यांची आतषबाजीत सोहळ्याचे स्वागत केले. सायंकाळी नऊ वाजता पालखी सोहळा मुक्कामासाठी येथील सोनबा गेनबा भुजबळ यांच्या घरी विसावला होता. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
पालखी विसावल्यानंतर कात्रज दूध संघाचे संचालक तानाजी जगताप, सरपंच अमोल खवले व पालखी सोहळ्याचे
प्रमुख नागनाथ झगडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.