गेवराई शिवारात विविध तीन ठिकाणी वाळू तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर ताब्यात
गेवराई : गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील बोरगाव थडी शिवारात विविध तीन ठिकाणी वाळू तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत एकूण 7 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर ३ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई आज (दि.१८) सकाळी तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि शंकर वाघमोडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. या कारवाईमुळे वाळू माफीयांचे धाबे दणाणले आहेत.
गेवराई तालुक्यातील गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत आहे. तालुक्यातील गोदावरी नदीतून विविध ठिकाणी केनीच्या सहाय्याने वाळू उपसा करुन ती अवैधरित्या टिप्पर, ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जाते. दरम्यान, आज तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील बोरगाव थडी याठिकाणी ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि शंकर वाघमोडे यांना मिळाली.
त्यांनी पोलीस उपनिरीक्षक भवर, पोलीस कर्मचारी अलगट, बागलाने, खंडागळे यांच्यासह वेगवेगळ्या तीन ठिकाणी धाड टाकून तीन ट्रॅक्टर पकडले. प्रत्येकी 2 लाख 55 हजार असा एकूण 7 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच या ट्रॅक्टर चालकांना ताब्यात घेतले.
दरम्यान, तलवाडा पोलीस ठाण्यात नव्याने पदभार घेतलेले शंकर वाघमोडे यांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात पंधरा दिवसांत ही दुसरी कारवाई केली आहे. त्यांनी वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.