पुणे कुत्र्यांनी पाठलाग करत चिमुकल्याला घेरलं अन्.., थरकाप उडवणारा VIDEO
पुणे : शहरातून एक भयंकर घटना समोर आली आहे. सोसायटी बाहेरील अंगणात खेळत असलेल्या एका ५ वर्षीय चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवला.
कुत्र्यांच्या कळपाने या चिमुकल्याला घेरलं आणि त्याचे अक्षरशः लचके तोडले. या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अनिरुद्ध जोंधळे (वय ५ वर्ष) असं गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्रीच्या सुमारास पुण्यातील वडगाव शेरी परिसरात घडला आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना सोसायटीमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पुणे फ्लॅश
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात ६ वर्षाचा चिमुरडा गंभीर जखमी
पुण्यातील उच्चभ्रू सोसायटी मधील घटना#Pune #DogAttcks #Viral #Video #PuneNews pic.twitter.com/9mcsDDmMcC
— Satish Daud Patil (@Satish_Daud) February 8, 2023
गेल्या काही दिवसांपासून पुणे (Pune) शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद पाहायला मिळत आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर मोकाट कुत्रे हल्ला चढवत आहे. पुणे महानगरपालिकेकडून मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी केली जात असतानाच, मंगळवारी रात्रीच्या सुमारास अनिरुद्ध जोंधळे या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांच्या कळपाने अचानक हल्ला चढवला.
सोसायटीबाहेर अनिरुद्ध खेळ असताना, कुत्र्यांच्या कळपाने त्याला घेरले आणि त्याचे लचके तोडले. दरम्यान, अनिरुद्धचा आक्रोश ऐकून सोसायटीमधील नागरिकांनी त्याच्याकडे धाव घेतली. नागरिकांनी कुत्र्यांच्या तावडीतून त्याची वेळीच सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेत अनिरुद्ध गंभीर जखमी झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही (Viral Video) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उच्चाद पाहायला मिळत आहे. पुणे महानगरपालिकेकडून मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुण्यातील वडगाव शेरी परिसरामध्ये असणाऱ्या सन सिटी मध्ये भटक्या कुत्र्यांचे कळप नागरिकांसाठी जीव घेणे ठरत आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री असल्याने ते धावत्या गाडीच्या मागे पळतात.
यासह हीच कुत्री लहान मुलांवरती हल्ला करतात. दरम्यान, अनिरुद्धसोबत घडलेल्या या भयंकर घटनेमुळे सन सिटी सोसायटीमधील रहिवासी रस्त्यावरती उतरले होते. नागरिकांनी थेट येरवडा पोलिस ठाणे गाठत या बाबत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर नागरिक माघारी फिरले.