अहमदनगर पोलिसांचं मॉक ड्रील वादाच्या भोवऱ्यात, दहशतवाद्यांकडून धार्मिक घोषणाबाजी
अहमदनगर : पोलिसांचं दहशतवादी पकडण्याचं मॉक ड्रील वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. अतिरेक्यांची भूमिका करणाऱ्यांनी धार्मिक घोषणा दिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाने याला जातीय रंग दिल्याचा आरोप करत औरंगाबादमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. अहमदनगर बस स्थानकात दहशतवादी घुसल्याचं मॉकड्रील पोलिसांनी मागच्या रविवारी केलं होतं, यावेळी अचानक पोलिसांचा एवढा फौजफाटा बघून नागरिकही घाबरून गेले होते. बंदुकधारी तीन अतिरेक्यांनी बस स्थानकाचा कब्जा घेतल्याची बातमी शहरभर पसरली. शिघ्र कृती दल, दंगल नियंत्रक पथक, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी, नगर तालुका भिंगार पोलिसांची पथकं घटनास्थळी दाखल झाली.
महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक, रुग्णवाहिकाही अहमदनगर बस स्थानकात पोहोचल्या. यानंतर दहशतवाद्यांची भूमिका करणाऱ्या तिघांना जेरबंद करण्यात आलं, मात्र हे मॉकड्रील असल्याचं समजल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलीस पथकाने केलेल्या या मॉकड्रीलची सगळीकडे चर्चा झाली, पण हे मॉकड्रील वादात सापडलं आहे. अतिरेक्यांची भूमिका करणाऱ्यांनी धार्मिक नारेबाजी केल्यामुळे दोन समाजांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याचा आरोप करत औरंगाबादमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.