बीड १२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर १२ कोटी जमा; बँकेच्या चुकीमुळे गडबड
बीड : जिल्ह्यातील तब्बल १२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बजाज अलायन्झ या विमा कंपनीने प्राधिकृत केलेल्या बँकेकडून १२ कोटी चुकून जमा झाले.
प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर १० हजार जमा झाल्याने त्यांना मोठा आनंद झाला असेल; मात्र हा आनंद औटघटकेचा ठरणार आहे.
सदर रक्कम संबंधितांकडून वसूल केली जाणार असून ११ बँकांना विमा कंपनीने तसे पत्र पाठवले आहे. विमा भरलेल्या बीड जिल्ह्यातील तब्बल १२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तब्बल १२ कोटी रुपये चुकून जमा झाले आहेत. आता ही रक्कम परत घेण्यासाठी विमा कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत.
कसे वसूल करणार?
ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्यावर १० हजार रुपये जमा झाले असतील, त्या खात्याला १० हजार रुपये गोठवले अर्थात होल्ड केले जाणार आहेत. त्यामुळे रक्कम काढता येत नाही.
पैसे परत दिले नाहीत तर काय होईल?
शेतकऱ्यांनी हे पैसे परत दिले नाही तर त्यांचे बँक खाते एनपीए जाते, सिबिल स्कोअर कमी होतो. परिणामी शेतकऱ्यास भविष्यात कर्ज घेता येत नाही. ९० दिवसांच्या आत रक्कम परत केली नाही तर त्या पैशांवर व्याज लागू शकते, तसेच कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते. या संदर्भात कृषी विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक अजिंक्य खिर्डीकर व जिल्हा व्यवस्थापक तौसिफ कुरेशी यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.