तिचे 17 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध,नैराश्यातून त्याची आत्महत्या
तमिळनाडू पोलिसांनी 23 वर्षांच्या शिक्षिकेला अटक केली आहे. या शिक्षिकेवर आरोप आहे की तिचे 17 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध होते. या शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबतचे प्रेमसंबंध तोडले होते, ज्यामुळे हा विद्यार्थी निराश झाला होता.
नैराश्यातून त्याने आत्महत्या केली. चेन्नईपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या सरकारी शाळेत शर्मिला ही शकवत होती आणि याच शाळेत असलेल्या विद्यार्थ्यासोबत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते असं सांगितलं जात आहे.
आत्महत्या केलेला विद्यार्थी हा 10वीत शिकत होता आणि शर्मिला ही गेली 3 वर्ष तो ज्या वर्गात होता, त्या वर्गाला शिकवत होती. या विद्यार्थ्याचे शर्मिलाच्या घरी येणे-जाणे होते. यादरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या दोघांच्या प्रेमसंबंधांबद्दल विद्यार्थ्याच्या मित्रांनाही कल्पना होती. अंबाट्टूरच्या महिला पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योतीलक्ष्मी यांनी सांगितले की, शिक्षिकेचं लग्न ठरलं होतं, ज्यामुळे तिने विद्यार्थ्यासोबतचे प्रेमसंबंध संपुष्टात आणण्याचं ठरवलं होतं. विद्यार्थी मात्र याला तयार नव्हता, तो शर्मिलाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता आणि तिच्यापासून त्याला वेगळं व्हायचं नव्हतं. या विद्यार्थ्याने 12 वीचा पेपर दिल्यानंतर आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं.
विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आईला यामागे काहीतरी कारण असावं असा संशय येत होता. तिने आपला संशय पोलिसांना बोलूनही दाखवला होता. यामुळे पोलिसांनी विद्यार्थ्याचा मोबाईल तपासला होता. यामध्ये त्यांना त्याचे शर्मिलासोबतचे ‘जवळकीचे’ फोटो सापडले होते. या दोघांमध्ये होणाऱ्या दीर्घ संभाषणांबाबतही पोलिसांना माहिती मिळाली आहे. या दोन्हीच्या आधारे पोलिसांनी शर्मिलाला अटक केली आहे.