‘भारत जोडो यात्रा’ १० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात
‘भारत जोडो यात्रा’ ही नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे १० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात आगमन करणार आहे. ही यात्रा २६ नोव्हेंबरपर्यंत मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांत फिरून पुढे मध्य प्रदेशात जाणार आहे.
त्यावेळी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे साहित्य स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांच्या हस्ते भारत जोडो यात्रेचे नेते राहुल गांधी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
‘मराठीचिये नगरी। ब्रह्मविद्येचा सुकाळ करी।’ म्हणणारे ज्ञानोबा आणि ‘आम्हां घरीं धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रें यत्न करूं।’ असे म्हणणाऱ्या तुकोबांपासून महाराष्ट्रातील पुरोगामी विचारगंगेचा उगम होतो. या पुरोगामी विचारगंगेला आजपर्यंत अनेक विचारप्रवाह येऊन मिळाले आहेत, त्यामुळेच महाराष्ट्र नेहमीच पुरोगामी विचारांचा एक बालेकिल्ला बनून राहिला आहे. ही पुरोगामी विचारगंगा जिवंत ठेवण्यासाठी हे पुरोगामी साहित्य, संत साहित्य, वैचारिक ग्रंथ, निबंध, आत्मचरित्र, कथा, कादंबऱ्या आणि कवितासंग्रह विविध स्वरुपात प्रसिद्ध झाले आहेत. या साहित्याने हे पुरोगामी साहित्य एकत्र करून ‘भारत जोडो यात्रे’स भेट म्हणून देण्याचा संकल्प स्वराज अभियान (Swaraj Abhiyan) व स्वराज इंडियाच्यावतीने ललित बाबर, सुभाष लोमटे, मानव कांबळे आणि संजीव साने यांनी केला आहे.
दरम्यान, समतेचा विचार देणाऱ्या ज्ञानोबा तुकोबांपासून राजर्षी शाहू महाराज, राष्ट्रपिता जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि एकविसाव्या शतकातील समकालीन विचारवंत, लेखक, कवींच्या ग्रंथसंपदेचा यामध्ये समावेश असणार आहे. हे साहित्य जमा करण्यासाठी विदर्भात विलास भोंगाडे, मराठवाड्यात सुभाष लोमटे, पश्चिम महाराष्ट्रात ललित बाबर, पुणे-नाशिक इब्राहिम खान आणि मुंबई, कोकण प्रदेशासाठी प्रा. श्याम पाखरे आणि वंदना शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. साहित्याची निवड करण्यासाठी डॉ. लता प्र. म., जयदेव डोळे, सुभाष वारे व प्रा. श्याम पाखरे यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.