शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची गळा आवळून हत्या
अकोला : अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची गळा आवळून हत्या करण्यात आली.
त्यानंतर मृतदेह तलावात फेकून देण्यात आला. भागवत अजाबराव देशमुख असं हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. दरम्यान, हत्या करून भागवतचा मृतदेह तलावाच्या पाण्यात राहल्याने त्याची ओळख पटू शकली नव्हती. त्यामुळे पोलिसांकडून (Police) त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला होता.
२७ ऑगस्टला पातुर पोलीस स्टेशन हद्दीतील कापशीच्या तलावात अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र, वैद्यकीय तपासणीच्या अहवालात या युवकाची हत्या झाल्याचं समोर आलं. आता पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तलावाच्या पाण्यात दोन दिवसापासून मृत्यू पडून असल्याने युवकाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांसाठी कठीण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर २९ ऑगस्ट रोजी अंत्यविधी केला. ३० ऑगस्ट रोजी पुन्हा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तलावाच्या परिसरातील पाहणी केली असता, अर्धा किमी अंतरावर एका रुमालमध्ये आधार कार्ड आणि इतर काही वस्तू आढळून आल्या.
या संदर्भात पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, सदरील युवक बेपत्ता असल्याची तक्रार अकोल्यातीलच खदान पोलीस स्टेशन येथे दाखल होती. भागवत देशमुख गेल्या २५ ऑगस्ट पासून बेपत्ता होता. त्याचा अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला. मात्र कुठलाही सुगावा हाती लागला नव्हता. अखेरस नातेवाईकांनी भागवत बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलीस ठाण्यात दाखल केली.
३१ ऑगस्ट रोजी नातेवाईकांना या संदर्भात पोलिसांनी माहिती दिली की, भागवत याची हत्या झाली असून तेव्हा कुठलीही ओळख न पटल्याने पोलिसांकडून त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला आहे. हे समजतात कुटुंबीयांना धक्का बसला. भागवत देशमुख याची अज्ञात आरोपीने आधी गळा आवळून हत्या केली, त्यानंतर त्याचा मृतदेह तलावात फेकून दिला.भागवतची हत्या २५ ऑगस्ट रोजी झाली असावी, असा अंदाज वर्तविला जातोय, सध्या या घटनेने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
भागवत देशमुख सुरुवातीला शिवसेनेचे अकोल्याचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचे वाहन चालक म्हणून होते. दरम्यान, काही वर्षानंतर भागवतने आपला प्रवास राजकीय क्षेत्रात वळविला. आता २३ ऑगस्टला अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात भागवतने प्रवेश केला होता. शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरीया यांच्या निवासस्थानी त्याने जाहीर प्रवेश केला होता, अन् त्याच्या खांद्यावर शिंदे गटाच्या शिवसेना उपशहर प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली होती.